सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 शहर

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नवले पुलावरील भीषण अपघातस्थळी पाहणी; प्रशासनाला दिल्या सूचना

डिजिटल पुणे    14-11-2025 11:35:02

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवार (दि. १३) सायंकाळी झालेल्या या अपघातात दोन कंटेनर आणि एक कार यांची जोरदार धडक होऊन मोठा स्फोट झाला. धडकेनंतर दोन्ही कंटेनरला आग लागली आणि त्यांच्या मधोमध अडकलेली कार पूर्णतः जळून खाक झाली. या दुर्घटनेत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे, तर २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या अपघातस्थळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दाखल झाले असून त्यांनी पाहणी करत आढावा घेतला आहे. त्यांच्या सोबत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. महानगरपालिका आणि पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या नवले पुलाची पाहणी करत अपघाताचे प्राथमिक कारण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना यावर चर्चा केली. काल रात्री याच ठिकाणी झालेल्या गंभीर अपघातामुळे मोठी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानंतर आज सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि पुढील पावलं ठरवण्यासाठी बैठका घेतल्या.

मिळालेल्या  माहितीनुसार, ही तीनही वाहने एकाच दिशेने भरधाव वेगाने जात होती. याच दरम्यान पुढे असलेल्या एका कंटेनरचा ब्रेक अचानक निकामी झाला.त्यामुळे मागून येणाऱ्या कारने आणि दुसऱ्या कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही कंटेनरमध्ये आग लागली आणि मधोमध असलेली कार त्या दोन्ही जळत्या वाहनांमध्ये अडकली. आगीत अडकलेल्या कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेत ट्रॅव्हलर बसमधील काही प्रवासीही जखमी झाले असून, एकूण २०  जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.

दुर्घटनेत सात ते आठ वाहनांचे नुकसान

हा अपघात सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत, सेल्फी पॉईंट हायवे परिसरात घडला. धडकेनंतर काही सेकंदांतच आगीचे मोठे लोळ उठले आणि महामार्गावर धुराचे लोट पसरले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आगीचा भडका इतका तीव्र होता की, काही वाहनचालकांनी आपली वाहने मागे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहतूक कोंडीत अडकले. अपघातात कारसह काही दुचाकी आणि अन्य वाहनांचेही नुकसान झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार, या दुर्घटनेत सात ते आठ वाहनांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

दोन तासांचा अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी सुमारे तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, सध्या पोलिसांकडून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती, मात्र आता रस्ता आंशिकपणे सुरू करण्यात आला आहे.

वाहतूक पूर्णपणे ठप्प अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा

या अपघातामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक वळवून महामार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या भीषण घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नवले ब्रिज परिसरात यापूर्वीही अनेक अपघात झाल्याने या भागातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि जबाबदार चालकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी सिंहगड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती