पुणे : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कोंढवा प्रभाग क्रमांक १९ मध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दि.१३ नोव्हेंबर रोजी सत्यानंद हॉस्पिटल जवळ मुख्य कोंढवा रस्त्यावर झालेल्या या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.सौ.मुबिना अहमद खान यांच्या प्रयत्नाने शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.मेळाव्याचे आयोजन अहमद खान आणि पदाधिकाऱ्यांनी केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला अविनाश बागवे, अभय छाजेड, उस्मान तांबोळी, यासिन शेख, कोंढवा प्रभाग अध्यक्ष नूरू शेख यांच्यासह अनेक पक्ष पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करीत आगामी निवडणुकांमध्ये संघटितपणे काम करण्याचा संदेश दिला. माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी कोंढवा परिसराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकजूट होऊन ताकदीने काम करू, असे सांगितले.मेळाव्याचे संचालन हुजूर इनामदार यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.मुबिना अहमद खान यांनी केली, आभार प्रदर्शन अहमद खान यांनी केले.
काँग्रेसला कोंढव्यात नवसंजीवनी
अनेक वर्षे मरगळलेल्या स्थानिक संघटनेला सौ.मुबिना अहमद खान यांच्या नेतृत्वामुळे नवसंजीवनी मिळाली असून शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.कोंढवा हा मुस्लिम बहुल परिसर असून गेली पंचवीस वर्षे हा भाग विकासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिला आहे. या भागाचा सर्वांगीण आणि खरा विकास फक्त काँग्रेसच करू शकते, असे मत मुबिना अहमद खान यांनी व्यक्त केले. त्यांच्या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली.महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात काँग्रेस पक्षाने प्रभाव दाखवत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.