मुंबई : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चार दिवसीय कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल. याचबरोबर महाराष्ट्र राज्य रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या विषयाचा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना आली आहे. याबाबत सकारात्मक विचार करू असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात ४ दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. समारोह कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रशिक्षक लोमेश नारखेडे, सल्लागार गजानन हेगडे, वरिष्ठ सल्लागार आशिष श्रीवास्तव, प्रशासकीय सहाय्यक ऋषी देठे, शॉर्ट टर्म कोर्सेस चे शुभम शेंडे, श्रावणी कोचरे, भूषण पवार तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.
११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मंत्रालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत एआय साधनांचा पत्रकारितेसाठी वापर कसा करावा, वृत्ताची पडताळणी, माहिती शोधण्याची गती, तसेच डिजिटल कामकाजातील अचूकता आणि सुलभता याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाला पत्रकारांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता हा उपक्रम राज्यभर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन घोषणेनुसार जिल्हा व तालुकास्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना आधुनिक एआय साधनांची ओळख आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष शिकण्याची मोफत संधी उपलब्ध होणार आहे.
या निर्णयाबद्दल बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “आज प्रत्येक पत्रकारावर बातमीच्या वेगासोबतच तिची अचूकता टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे. अशा वेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नाही, तर कामाला नवी धार देणारे साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या माध्यमातून पत्रकारांद्वारे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि हेच या उपक्रमाचे खरे यश ठरेल”
चार दिवसीय कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जशनानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना कोणकोणते प्रॉम्प्ट द्यायचे, चॅट जीपीटीला कोणकोणते पर्याय आहेत, त्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी इतर कोणते सहायक टूल्स आहेत. फोटोवरून बातमी कशी बनवायची, फोटोवरून व्हिडिओ कसा बनवायचा, न्युज रिपोर्ट कसा बनवायचा. प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियासाठी बातमी कशी वापरायची ? त्याचप्रमाणे चॅट पीडीएफ चा वापर कसा करायचा याची माहिती त्यांनी दिली.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की, ‘एआय’ फॉर न्यूज या विषयाचा डिप्लोमा सुरू करण्याची सूचना आली आहे याबाबत सकारात्मक विचार करू. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना त्यांच्या दैनदिन कामात अत्यंत उपयुक्त ठरेल.
पत्रकारांनी त्यांना या कार्यशाळेबद्दल चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या कार्यशाळेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.एआय पत्रकारिता कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.या वेळेला पत्रकार दीपक कैतके, पत्रकार संजय जोग, पत्रकार क्लारा लुईस यांनी चार दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेविषयी मत व्यक्त केले.मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आभार मानले. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्र संचालन केले. कार्यकारिणीचे सदस्य खंडूराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.