सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा; नव्या व्हिडीओने खळबळ, मालवणमध्ये शिवसेनेनंही पैसे वाटल्याचा माजी आमदाराचा दावा
  • मोठी बातमी: नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले, दोनजण ताब्यात, गाड्या भरुन बोगस मतदार आणल्याची माहिती
  • नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन धडाधड बंद पडल्या, अपक्ष उमेदवाराचं बटणचं दाबलं जाईना
 शहर

मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वेद, गीतेकडे परतण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

डिजिटल पुणे    02-12-2025 10:15:23

पुणे : समरसता, बंधुभाव, एकता राखणे ही वेदांची शिकवण असून संघटन ही एक ताकद असल्याचा वेदांचा उपदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी आपल्याला वेद, गीता, उपनिषदांकडे पुन्हा जावे लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.वेदश्री तपोवन, मोशी येथे वेदश्री तपोवन कार्य समिती, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, संत ज्ञानेश्वर गुरुकुल, गीता परिवार, श्री कृष्ण सेवा निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गीता जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शांतीब्रम्ह ह. भ. प. मारुती महाराज कुरेकर यांना संत ज्ञानेश्वर पुरस्कार, श्री चिलकूर बालाजी वेंकटेश्वर स्वामी मंदिर, हैदराबादचे अर्चक व विश्वस्त सी. एस. रंगनाथन यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार तसेच संत साहित्य अभ्यासक डॉ. मुकुंद दातार यांना समाज सेवा क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम केल्याबद्दल मानचिन्ह, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अयोध्या येथील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र प्रतिष्ठान अयोध्याचे कोषाध्यक्ष तथा श्रीकृष्ण जन्मभूमी मथुराचे उपाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, गीता जयंती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अभय सुरेशकुमार भुतडा, गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी आदी उपस्थित होते.

स्वामी गोविंद गिरी यांनी वेदांपासून उपनिषदांपर्यंत भारतीय ऋषी मुनींचे ज्ञान येणाऱ्या पिढ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेसाठी प्रसारित करण्याची चालविलेली मोहीम महत्वपूर्ण असल्याचे सांगून राज्यपाल देवव्रत म्हणाले, गीता परिवार, तपोवन वेदश्री तसेच देशभरात सुमारे ५० वेद विद्यालयाच्या, गुरुकुलांच्या माध्यमातून गोविंदगिरी महाराज करत असलेले वेद, गीता शिक्षणाचे काम अत्यंत अभिमानाचे आहे. गोविंद गिरी यांनी वेदांची महती पुनरुज्जीवत करण्याचे काम केले. वेद केवळ भारत आणि भारतीयांचाच नव्हे तर विश्वाचा महान वारसा आहे. वेदांचा सार उपनिषदे असून उपनिषदांचा सार गीता आहे, असेही ते म्हणाले.

राज्यपाल पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संत महात्म्यांची भूमी राहिली असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतीय जीवनमूल्यांच्या स्थापनेसाठी मोठे अभियान चालविले तसेच सर्वांना प्रेरित केले. कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून जगाला संस्कृत भाषेत सांगितली. संपूर्ण समाजाने अध्यात्मिक, सामाजिक, भौतिक जीवन कसे जगले पाहिजे याचे मार्गदर्शन गीतेने केले. ही गीता संत ज्ञानेश्वर यांनी प्राकृत भाषेत पोहोचवली. हे ज्ञान हजारो बालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कुरेकर महाराज यांनी केले तसेच चिलकूर बालाजी मंदिराचे दरवाजे सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी काम केल्याबद्दल सी. रंगनाथन यांचे अभिनंदन केले.

आचार्य देवव्रत यांनी पुढे नमूद केले, पाच हजार वर्षांपूर्वीपासून गीतेचे ज्ञान मानवतेचे अध्यात्म, कर्म, योग, भक्ती आदी क्षेत्रात मार्गदर्शन करत असून मानवाच्या जीवनातील कोणताही अडथळा, दु:खाचे निवारण नाही ज्यावर गीतेमध्ये उपाय नाही. हा आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जो वेदांतून प्रवाहित झाला, उपनिषदातून वाढला आणि गीतेतून प्रवाहित झाला. आज युवकांना गीतेचे ज्ञान दिल्यास ते भोगवादापासून, व्यसनांपासून दूर राहतील, असेही मत त्यांनी मांडले.ते पुढे म्हणाले, एका काळी जगातील सर्व देशातील विद्यार्थी भारतातील गुरुकुलातील आचार्यांकडून शिक्षण घेत होते. येथे जगात मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्याने देश समृद्ध होता. आज आपल्या भाषा, संस्कृतीवर अभिमान करत नसताना आपली वेश भूषा आणि खान पान गुलामीच्या काळाप्रमाणे प्रभावित झालेली असताना आज पुन्हा गोविंद गिरी ह. भ.प. कुरेकर, सी. रंगराजन यांच्यासारख्या व्यक्ती भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.

गोविंद गिरी म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी गीतेला प्राकृत भाषेत भाषांतरीत करून सामान्यांपर्यंत गीतेचे ज्ञान पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी आळंदीतून हे काम केल्यामुळे गीता जयंती महोत्सव आणि गीतेचा मराठी भाषेत अभ्यास खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणे योग्य आहे. देशातील सर्व घटकांना गीतेने मार्गदर्शन केले आहे. क्रांतीकारकांनीही गीतेचा प्रचार व अभ्यास केला, असेही ते म्हणाले.यावेळी ह. भ. प. कुरेकर तसेच रंगनाथन यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी श्लोकांची अंताक्षरी, गीतेतील श्लोकांकावरून श्लोकाचे गायन आदींचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वेद विद्यालय, गुरुकुल, वारकरी विद्यालय आदी ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या आणि गीता अभ्यासाच्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी पुरस्कार देण्यात आले.

राज्यपालांची वेदश्री तपोवन वेद विद्यालयाला भेट

तत्पूर्वी राज्यपालांनी वेदश्री तपोवन येथील वेद विद्यालयाला भेट दिली. या ठिकाणी वेदाचे अध्यापन करण्यात येते. येथे वेद, उपनिषदे आदींच्या अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय असून ई- लायब्ररी आहे. प्राचीन ग्रंथ स्कॅन करून ठेवण्याचे काम येथे सुरू आहे, अशी माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती