पुणे : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदित्य प्रतिष्ठान प्रस्तुत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संघकार्याच्या शताब्दी यात्रेत देशाच्या प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा मनाला नवीन उर्जा आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारा ठरला, असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
या भव्य सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवतजी, कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामीजी, तसेच आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकरजी आणि अपर्णा अभ्यंकरजी उपस्थित होते.
विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्याच समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उपकाराची अथवा अहंकाराची भावना नाही,असेही ते म्हणाले. संघाला संपूर्ण समाजाचे संघटन अभिप्रेत आहे. कारण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल. राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वाला सुखशांती लाभेल. यातही देशाचे कल्याण संघच करेल, अशी आमची वल्गना नाही. तर समाज उभा राहिला तरच देश उभा राहील." कठीण काळामध्ये समाजानेच संघाला साथ दिली, म्हणून संघ मोठा झाल्याचेही सरसंघचालक म्हणाले.
