सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 विश्लेषण

कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपटाची चर्चा; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

डिजिटल पुणे    27-05-2026 14:48:57

मुंबई : वास्तव घटनांवर आधारित चित्रपटांची परंपरा पुढे नेत आता आणखी एक धक्कादायक विषय रुपेरी पडद्यावर येणार आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमधून करण्यात आली असून, या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी वास्तववादी कथानकावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा पोस्टरमधून करण्यात आली आहे.

‘आता सगळं उघड होणार...!’ ही चित्रपटाची टॅगलाईन अनेक गुपितांचा पर्दाफाश होणार असल्याचे संकेत देत आहे. पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली व्यक्ती, हातातील पैशांच्या बंडल्स, क्राईम सीनच्या फिती आणि भिंतीवरील संशयास्पद फोटो यामुळे चित्रपट नेमका कोणत्या गाजलेल्या प्रकरणावर आधारित आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पोस्टरमध्ये ‘नाशिक’ आणि ‘भोंदूबाबा’ असे उल्लेखही दिसून येतात.

चित्रपटाची कथा अद्याप गुप्त ठेवण्यात आली असून कलाकारांची नावेदेखील जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र, मोशन पोस्टरमुळे हा चित्रपट कॅप्टन अशोक खरात यांच्या कथित वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी आकाश काकडे सांभाळणार आहेत. कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर, वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून सचिन घणवंत प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहणार आहेत. तसेच नेहा घोडके प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून कार्यरत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती