पुणे : राज्यात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला असून आज (9 जून) अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे 30 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय होत असल्याने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबारमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या दमदार मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान विभागाने पुढील दोन दिवसही पावसाची शक्यता कायम असल्याचे म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या मते, मराठवाड्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने होण्याची शक्यता असून 12 ते 19 जूनदरम्यान मान्सून संपूर्ण विभाग व्यापू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस होईपर्यंत खरीप पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
याशिवाय, 15 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांत विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस सुरू राहू शकतो. मात्र सर्वत्र समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत. विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असून मराठवाड्यातही उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो.