पुणे : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. हे आंदोलन 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर होणार आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे हे दुसरे मोठे आंदोलन ठरणार आहे. पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी येथे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
यापूर्वी 6 जून रोजी जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक आणि तरुण सहभागी झाले होते. या आंदोलनात प्रसिद्ध शिक्षण सुधारक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही उपस्थिती लावली होती. अनेक आंदोलकांनी प्रतीकात्मक स्वरूपात कॉकरोचचे मुखवटे परिधान केले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाबाबत केलेल्या ‘अराजकतावादी’ या वक्तव्यावर अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी, “जय भीमच्या घोषणा अराजकता आहेत का?” असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी आणि सुधारणावादी राज्य म्हणून असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे सांगताना दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली. केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी प्रश्न सुटणार नाहीत, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.आगामी पुणे आंदोलनात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांबरोबरच उत्तरदायित्व आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर भर दिला जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.