नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 28 वर्षीय प्रतिक सुभाष रासकर याने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (7 जून) मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली असली तरी अद्याप त्याचा मृतदेह हाती लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक रासकर हा शेअर मार्केटशी संबंधित प्रशिक्षण वर्गांच्या कामात कार्यरत होता. घटनेच्या दिवशी त्याने कुटुंबीयांना "बाहेर जेवायला जात आहे" असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो कारने अटल सेतूवर पोहोचला आणि पुलावरील सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवत समुद्रात उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ही घटना 7 जून रोजी रात्री 1 वाजून 29 मिनिटांच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी समुद्रात शोधमोहीम सुरू केली. मात्र, उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध लागलेला नव्हता.
प्रतिकने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिकचा रंग गोरा, शरीरयष्टी मजबूत आणि उंची अंदाजे 5 फूट 10 इंच होती. त्याचे काळे वाढलेले केस, काळे डोळे तसेच वाढलेली दाढी-मिशी अशी ओळख होती. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती.