सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • ७ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन
  • एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  • देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
 विश्लेषण

कुर्ला अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

डिजिटल पुणे    10-12-2024 16:25:00

मुंबई : सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये एका भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे. 

बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसकडून ट्वीट करत या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले की “कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

दरम्यान, जखमींवर भाभा रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स रुग्णालय, हबीब रुग्णालय, सायन हॉस्पिटल, फौझिया रुग्णालय, कुर्ला नर्सिंग होम अशा विविध रुग्णालयात उपाचर सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती