सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

निळू फुलेंच्या एका शब्दावर विलासरावांनी हलवली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सूत्र

डिजिटल पुणे    26-05-2023 16:25:04

पुणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंतग कॉँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. यांचा जन्म २६ मे १९४५ रोजी महाराष्ट्रातील बाभळगावात झाला.  देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. त्यांचा वाढदिवसानिमित्तनं  मुलगा रितेश देशमुख यानं त्याच्या सोशल मीडियावरून एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना रितेशनं त्याच्या दोन मुलांचे फोटो शेअर केले आहेत, पोस्टमध्ये त्यानं लिहिलं आहे की ,' माझ्या खडतर काळात मला जेव्हा हताश वाटतं, काहीच करता येणार नाही असं वाटतं, पराभूत झाल्यासारखं वाटतं, त्यावेळी मी विचार करतो की मी कुणाचा मुलगा आहे. या एकाच विचारानं मी पुन्हा एकदा जग जिंकण्यासाठी सज्ज होतो, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाबा, 

विलासरावांची राजकीय कारकीर्द जितकी मोठी तितकाच त्यांचा कलेचा व्यासंग होता. त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलेवर भरभरून प्रेम केले. असाच एक त्यांचा किस्सा आहे, ज्यातून ते कलाकारांच्या शब्दाला किती मान देतात हे कळतं. हा किस्सा आहे विलासराव देशमुख आणि अभिनेते निळू फुले यांच्या मधला.  महाराष्ट्र भूषण' पुरस्कारावरून काहीदिवसापूर्वी बराच गदारोळ झाला. इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हा किस्सा शेयर केला होता, त्यांनी लिहिलं होतं की. ''२००४ साल असावे. मी निळुभाऊंकडे बसलो अस्ताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा निळू फुले यांना फोन आला. ते म्हणाले, आमच्या शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे.तुमची संमती हवी.''

''निळूभाऊंनी त्यांचे आभार मानले आणि या पुरस्काराला पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे वट्ट मोजून पैसे घेतो. यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही.''

''मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे, असे भाऊंनी सीएमना सुनावले.''तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्चच्या माध्यमातून मोठे काम केलेले आहे." भाऊंची ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली. आणि २००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला. 

पण या सगळ्यात कौतुक आहे ते विलासरावांच्या कार्याचं. यासंदर्भात निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले म्हणतात, "या सगळ्यामधे कौतुक माझ्या बाबांबरोबर विलासरावांचं पण वाटतं की त्यांनी बाबांचं ऐकलं किती मोठेपण दोघांचं आणि विश्वासपण!"


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती