सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घ आजाराने निधन ; वयाच्या ७४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुजा    12-02-2024 10:46:45

पुणे : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. ते ७४ वर्षांचे होते. जुन्नर विधानसभेचे त्यांनी अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. वल्लभ बेनके हे पवार कुटुंबियांचं निकटवर्तीय मानले जायचे. बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.  

सोमवारी (दि. १२) सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक(ता. जुन्नर ) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जुन्नर विधानसभा मतदार संघातून सलग सहावेळा (१९८५ ते २००९) निवडणूक लढवून त्यातील चार वेळा ते निवडणूक जिंकले होते. 

वल्लभ बेनके यांची राजकीय कारकिर्द : 

वल्लभ बेनकेंचा जन्म २३ जून १९५० रोजी हिवरे बुद्रूक या छोट्याशा गावात झाला. त्यांचा शेती प्रमुख व्यवसाय होता. कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी बेनके यांची ओळख आहे. बेनके हे शरद पवारांच्या विश्वासातील नेते होते. प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. आजारपणामुळे मागील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते.

धरणग्रस्तांच्या प्रश्‍नासाठी ते विविध आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता. या धरणग्रस्तांच्या आंदोलनातूनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाकामासाठी अनेक प्रकल्प दरबारातून मंजूर करून घेतले होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील देवस्थानांचा विकास करण्यासाठीही निधी मिळवून दिला होता. त्यांनी नारायणगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू केले होते.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती