सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेची तब्येत खालावली ; डॉक्टरांना तपासणी करण्यासही दिला नकार

पुजा    12-02-2024 11:22:43

जालना : मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी या गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे.  

मागील सहा महिन्यातील मनोज जरांगे पाटील यांची आंदोलन करण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव अंतरावाली सराटीमध्ये उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा बांधवांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं बोललं जात आहे.  

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिली होती. मात्र, वेशीवरच त्यांचे आंदोलन थांबवत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता. सोबतच पंधरा दिवसांत या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या याच उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तसेच अजूनही सरकारकडून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी कुणीही आलं नसल्याचं किंवा संपर्क साधण्यात आले नसल्याचं जरांगे म्हणाले आहे. विशेष म्हणजे आज सरकारकडून जरांगे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती