सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

झाला मोठा राजकीय भूकंप ; अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यपदाचा दिला राजीनामा

पुजा    12-02-2024 14:10:27

मुंबई : काँग्रेस आमदार, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. काँग्रेस पक्ष सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. काँग्रेसपदाचा राजीनामा पत्रात त्यांनी माजी आमदार असा उल्लेख केलाय. यामुळे त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा दिला होता असं म्हटलं जातंय. अशोक चव्हाण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा, नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांनी काहीदिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आता अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. तसेच, राज्यातील भूकंपाचे धक्के थेट दिल्लीतील काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना बसले आहेत. अशोक चव्हाण म्हणजे, काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते. महाराष्ट्रात काँग्रेस मोठी करण्यात आशोक चव्हाणांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकांपूर्वी अशोक चव्हाणांनी सोडलेल्या साथीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशातच काँग्रेसला घरघर लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या…” 

अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यापाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नाना पटोल यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.

त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी 'एक्स' या सोशल प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.” तसेच चव्हाण यांनी समाजमाध्यमांवरील त्यांच्याबाबतची माहिती अपडेट केली आहे. वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर असलेल्या त्यांच्या प्रोफाईलवरील काँग्रेससंबंधीची सर्व माहिती हटवण्यात आली आहे.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती