सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

आर्यन खान केस; २८ दिवसांचा तमाशा, काय खरे काय खोटे?

डिजिटल पुणे    31-10-2021 13:17:54

     गेले महिनाभर आपण सर्व मीडियामध्ये पाहिले मुंबई ड्रग्स केस, आर्यन खान, समीर वानखेडे, नवाब मलिक यांच्याच नावाची चर्चा दिसली. अलीकडेच यामध्ये किरीट सोमय्या यांनी देखील उडी घेतल्याचे पाहायला मिळाले. 

     वास्तविक पाहता हे प्रकरण एका ड्रग्स पार्टीवर टाकलेली रेड, तेथून ताब्यात घेतलेली मुले आणि त्यांच्यावर चाललेली कारवाई इथेपर्यंत मर्यादित असायला हवे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी याप्रकारणी ज्यापद्धतीने पत्रकार परिषद घेतल्या, ज्यापद्धतीने रोज नवनवीन ट्विट करून तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले, ते अत्यंत चुकीचे होते. समीर वानखेडे काही आज एनसीबीमध्ये दाखल झालेत असे नाही किंवा ही त्यांची पहिलीच ड्रग्सची केस पाहतायेत असे नाही. यापूर्वीही सुशांत सिंह प्रकरणांमध्ये जेंव्हा रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावावर ड्रग्सचे आरोप झाले होते आणि ते प्रकरण सुशांत सिंहच्या मृत्युवरून अचानक ड्रग्स प्रकरणाकडे वळवले गेले होते, त्यावेळीही ती केस समीर वानखेडेच पाहत होते. आता यामध्ये रिया चक्रवर्ती ही कोणा मोठ्या बापाची मुलगी नव्हती किंव्हा त्यावेळी देशातील मोठ्या वर्गाची सहानभूती सुशांत सिंहच्या मागे होती म्हणून बहुदा नवाब मलिक त्यामध्ये पडले नसतील. किंवा कदाचित त्यावेळी त्यांना हा साक्षात्कार झाला नसेल की समीर वानखेडे यांनी चुकीची कागदपत्रे दाखवून या पोस्टवर भरती झाले होते. नवाब मलिक म्हणतात तसे समीर वानखेडे यांनी चुकीच्या कागदपत्रांचा वापर केलाही असेल, आणि त्यामध्ये ते दोषी असतील सुद्धा, ते चौकशीअंती स्पष्ट होईलच. पण मुद्दा असा आहे की त्यांच्यावर आरोप करण्यासाठी शाहरुखच्या मुलावर कारवाई होण्याची वाट का पहावी लागली? म्हणजे यातून हेच स्पष्ट होते की हे राजकीय नेते ज्यावेळी असे प्रकरण आपल्या किंवा आपल्या एखाद्या 'हितचिंतकाच्या' अंगाशी येते त्यावेळीच दुधारी तलवार घेऊन रणांगणात उतरतात. मात्र यातून एक मोडस ऑपरेंडी कळली ती म्हणजे एखादे हायप्रोफाइल प्रकरण तपासाठी आल्यावर सर्व जनतेची लक्ष त्यातून अलगद काढून दुसऱ्या प्रकरणात टाकायचे म्हणजे मूळ मुद्दा काय होता हेच लोक विसरून जातात. सुशांत सिंह प्रकारणाच्या वेळी देखील हेच झाले. त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हणलेल्या एका वाक्याची आज आठवण आली आणि ते म्हणजे, या सर्व घडामोडींमध्ये मूळ मुद्द्याला बगल देण्याचे काम सुरु आहे.

     तिकडे भाजपची मात्र या सर्व प्रकरणात चिडीचूप शांतता पाहायला मिळाली. बहुतेक त्यांना यातून सरकार विरोधाचा कोणता मुद्दा दिसला नसेल राजकारणासाठी. शेवटी समीर वानखेडे यांच्या परिवारालाच जाऊन किरीट सोमय्या यांची भेट घ्यावी लागली आणि  किरीट सोमय्या यांनी देखील सोशल माध्यमांमध्ये एकच पोस्ट करून आम्ही या परिवारासोबत आहोत हे दाखवले. कदाचित ते इतर राजकीय मंडळींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुरावे गोळा करण्यात व्यस्त असतील. मात्र विरोधी पक्षाकडून देखील हेच पाहायला मिळाले की जर यामध्ये आपला कोणता फायदा नसेल तर आपण तरी यामध्ये कशाला पडावे.

     या सर्व प्रकरणामध्ये दोन लोकांचा मात्र मोठा फायदा झाला. एक म्हणजे न्यूज चॅनेल, मीडिया यांना बऱ्याच दिवसांनी दिवस रात्र बातमी चालवण्यासाठी मुद्दा मिळाला. आणि दुसरा म्हणजे आर्यन खान याचा तो कसा ते पुढे सांगतोच. मात्र मीडियाने या प्रकरणामध्ये अक्षरशः कळस गाठला. आर्यन खानच्या जामिनाच्या दिवशी तर त्याची कार सिग्नलला किती वेळ थांबली वगैरे सारख्या टुकार बातम्या लोकांचे मत म्हणून दाखवण्यात या चॅनेल्सना गरजेचे वाटले. तसेच त्याच्या घरासमोर चाहत्यांनी फटाके फोडून कसा जल्लोष केला हेही तितक्याच चवीने दाखवले जात होते. हे सर्व पाहून प्रश्न असा पडतो की हे सर्व सामान्य जनतेला आवडते म्हणून दाखवतात की सामान्य जनतेला असे करणे आवडावे म्हणून दाखवतात कळतच नाही. मात्र यातून सर्व चॅनेलसचा टीआरपी मात्र नक्कीच वाढला. 

     राहिला मुद्दा आर्यन खानचा, तर कोणत्याही फिल्म जगतातील व्यक्तींना प्रसिद्धीची गरज असतेच. शाहरुख खानचा मुलगा इतक्या एका गोष्टीवर त्याला आपले फिल्म जगतातील स्थान पक्के करणे आजकालच्या स्पर्धेच्या युगात कठीण आहे. इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नवनवीन मुलांनी तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाऱ्या कलाकारांची तगडी स्पर्धा आहे. या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी करणे गरजेचेच असते. जर आर्यनकडे ड्रग्स मिळाले नाहीत, जर त्याने ड्रग्स घेतले नव्हते आणि त्याचा या पार्टीशी काहीही संबंध नव्हता तरी देखील इतक्या मोठ्या व्यक्तीच्या मुलाला देशातील इतके मोठे वकील त्याच्या पाठीशी असताना, ज्यांनी अनेक अभिनेत्यांची अनेक प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यांना साधा जामीन घ्यायला २८ दिवस लागले?? कोण विश्वास ठेवेल यावर? मात्र ज्या पद्धतीने त्याच्या निवासस्थानी त्याच्या चाहत्यांनी जल्लोष करत त्याचे स्वागत केले यावरून हेच स्पष्ट झाले की काल पर्यंत फक्त शाहरुख खानला पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर गर्दी करणाऱ्याला चाहत्यांना आता आर्यन खानला देखील पाहण्याची तितकीच उत्कंठा लागली होती. तेही जमिनावर सुटून आल्यानंतर.

     त्यामुळे या सर्व बारीक आणि सखोल अभ्यास केला असता इतकेच लक्षात येते जी ज्यांनी त्यांनी आपला फायदा करून घेण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग करून घेतला. यातील खरे काय आणि खोटे काय हे सुशांत सिंह प्रकरणासारखेच बाहेर आलेच नाही आणि येणारही नाही. यातून नुकसान मात्र सामान्य वर्गाचे झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न, एसटी चालकांचे प्रश्न या सर्व गोष्टींमुळे मागे पडले. त्या मुद्द्यांवरून राज्यसरकार जनतेला अलगद बाजूला ठेवता आले. आणि त्यानंतर देखील थोडे फार प्रश्न सोडवले असे दाखवण्यासाठी काही भत्ते वाढवून त्यांचे संप संपवण्यात आले. मात्र खरेच हे भत्ते वाढवून त्यांचा पूर्ण प्रश्न सुटणार असता तर भत्ते वाढवल्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका एसटी चालकाने आत्महत्या नसती केली. विदर्भाच्या शेतकऱ्याला पॅकेज जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी बीड मध्ये शेतकऱ्याची आत्महत्या नसती झाली. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती