पुणे : इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे) तर्फे 'ग्रीन कॉन्क्लेव-२०२५' ही परिषद १८ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केली आहे. ही परिषद कार्बन-न्यूट्रल इव्हेंट असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुजलॉन वन अर्थ (मगरपट्टा, हडपसर, पुणे) या ग्रीन बिल्डिंगमध्ये आयोजित केली आहे.
'शून्य - नेट झिरो साध्य करणे हे आपले कर्तव्य' ही या परिषदेची संकल्पना आहे, जी शाश्वतता आणि पर्यावरणीय संतुलन यासाठीची बांधिलकी दर्शवते. ग्रीन कॉन्क्लेव-२०२५ ही परिषद धोरणनिर्माते, उद्योगजगताचे मान्यवर आणि नाविन्यपणे काम करणारे तज्ज्ञ यांना एकत्र आणणार आहे.एचव्हीएसीआर,रेफ्रिजरेशन, बांधकाम क्षेत्रातील शाश्वततेसाठीचे उपाय शोधण्यावर भर दिला जाणार आहे.ऊर्जा, पाणी आणि कचऱ्याचे 'नेट झिरो 'लक्ष्य, शाश्वत शीतकरण तंत्रज्ञान, बांधकाम क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपाय, शून्य नेट झिरो एक्सेलेरेटर पुरस्कार आणि शाश्वत फॅशन शो ही या परिषदेची वैशिष्ट्ये आहेत.नेट झिरो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या परिषदेत भारत आणि जागतिक नियामक परिस्थिती आणि डीकार्बोनायझेशनसाठी ऊर्जा कार्यक्षमता आणि शाश्वत शीतकरणाची भूमिका यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे ग्रीन कॉन्क्लेवच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, 'क्रेडाई'चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे हे मान्यवरही सहभागी होतील.ज्येष्ठ आर्किटेक्ट संदीप शिखरे यांचे बीजभाषण होईल.या कार्यक्रमात सायंकाळी ७ वाजता विविध पर्यावरणस्नेही पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.या परिषदेमध्ये आर्किटेक्चर डिझायनर करिन मीसेनबर्गर(व्हीएन्ना),दीपेन्द्र प्रसाद(दिल्ली),शैलेन्द्र शर्मा, श्रुती नारायण,जयधर गुप्ता,आदित्य चुणेकर विविध विषयांवर संवाद साधतील. 'इशरे'चे राष्ट्रीय अध्यक्ष बलानीदेखील परिषदेत उपस्थित राहणार आहेत.
बांधकाम उद्योगातील कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक बिल्डर्स यांची गोलमेज परिषद सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत डीकार्बोनायझेशन सनद(चार्टर)वर चर्चा होईल. सर्वानुमते त्यातील मुद्दे निश्चित केले जातील.या सत्राचे अध्यक्ष पंकज धारकर असतील, तर डॉ. सुनीता पुरुषोत्तम या मॉडरेटर म्हणून उपस्थित राहतील.आशुतोष जोशी (इशरे पुणे चॅप्टर अध्यक्ष), चेतन ठाकूर (इशरे पुणे चॅप्टर नियोजित अध्यक्ष), डॉ.पूर्वा केसकर (परिषदेच्या संयोजक), अरविंद सुरंगे (परिषदेचे अध्यक्ष), वीरेंद्र बोराडे (इशरे पुणे चॅप्टर माजी अध्यक्ष), सुजल शेठ (कार्यक्रम प्रमुख आणि गोलमेज परिषद प्रमुख), सुभाष खनाडे (खजिनदार), रशीदा शब्बीर (महिला प्रमुख आणि परिषदेच्या मार्केटिंग प्रमुख) आणि देवीका मुथा (सह-महिला प्रमुख) यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.