वडगाव शेरी : वडगाव शेरी परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी जमीन मालक जमीन देत नसल्याने आणि त्याचा परिसरावर परिणाम होत असल्याने अखेर नगरविकास प्रकल्प (टीपी स्कीम) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी आज शहर सुधारणा समितीत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
वडगाव शेरी गावाचा समावेश पुणे महानगरपालिकेत 1997 मध्ये झाला व विकास आराखडा 2005 मध्ये जाहीर झाला.शेवटी 2007 मध्ये मंजूर झाला.पण गेल्या 15 वर्षात वडगावशेरीचा फारसा विकास झालेला नाही. याउलट वडगाव शेरी वगळता या भागातील इतर मोकळ्या जागा मोठ्या रस्त्यांमुळे विकसित झाल्या आहेत. 2007 पासून वडगाव शेरी येथील जमीन मालक रस्त्यासाठी लागणारी जमीन घेण्यास तयार नाहीत. या गावातील रस्ते विकसित करून टीपी स्कीम राबविणे गरजेचे असल्याने टीपी स्कीम राबवावी, अशी मागणी माजी नगरसेविका शीतल शिंदे यांनी केली.
त्यानुसार हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. शहर सुधारणा समितीच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली आहे.