मुंबई : श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार असून, आधुनिक सुविधा, संग्रहालय तसेच स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत हा किनारा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. दिवेआगर समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, दिवेआगर किनाऱ्याचा सौदर्यदृष्टीने विकास श्रीवर्धन किनाऱ्याच्या धर्तीवर करण्यासंदर्भात कार्यवाही जलदगतीने करावी. यासाठी उच्च दर्जाची व शाश्वत साधनसामग्री वापरून पर्यावरणपूरक सुविधा उभारण्यात याव्यात. पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
वन विभागाला देण्यात येणारे प्रस्ताव सल्लागार संस्थांच्या माध्यमातून तातडीने पाठविण्यात यावेत. तसेच समुद्र किनाऱ्याच्या विकासादरम्यान पर्यावरणाचे संतुलन राखून वृक्षांचे पुनर्रोपण करण्यावर भर द्यावा. या विकास प्रकल्पामुळे दिवेआगर परिसरातील पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.