छत्रपती संभाजीनगर : कुंभमेळा २०२७ च्या निमित्त जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर , वेरुळ, पैठण व आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखडा तयार करतांना आपल्या जिल्ह्यात शाश्वत सुविधांचा विकास व्हावा व पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याचे देशभरात नाव होऊन लौकीक वाढवावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर, वेरुळ, पैठण व आपेगाव कुंभमेळा २०२७ विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, विधानसभा सदस्य आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्त लाखो भाविक, पर्यटक, साधुसंत हे महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. त्यात जिल्ह्यातील वेरुळ आणि पैठण हे स्थळ महत्त्वाचे आहे. अंदाजे एक कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत येतील असा अंदाज घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यात प्रामुख्याने परिवहन व वाहतूक व्यवस्था, मुलभूत सुविधा, भाविक पर्यटकांची सोय व राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक स्थळांचे जतन या महत्त्वाच्या बाबी विचाराधीन करुन सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.
असा आहे आराखडा
वेरुळ व छत्रपती संभाजीनगर येथील विकासकामांचा आराखडा ७१२६ कोटी २९ लाख रुपयांचा असून पैठण व आपेगाव येथील आराखडा २५०७ कोटी २२ लक्ष असा एकूण ९६३३ कोटी ५१ लक्ष रुपयांचा आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
वाहतुक व्यवस्थाः- वाहनतळांसाठी १३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग आणि निवास व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात धुळे सोलापूर महामार्ग (समृद्धी महामार्ग लगत), धुळे सोलापूर महामार्ग (कन्नड लगत), खुलताबाद रस्ता (फुलंब्री कडील बाजू), छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग-५२ लगत अशा ठिकाणी ही पार्किंग स्थळे व निवास व्यवस्था निर्माण करण्यात येईल. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, वन वे मार्ग, फेरी बसेस, धार्मिक स्थळांच्या जवळ ई- रिक्षा सेवा, बस स्थानकांवर रियल टाईम डिस्प्ले, आणीबाणीच्या कालावधीतील वाहनांसाठी (अग्निशमन वहने, रुग्णवाहिका, सुरक्षा दलाची वाहने इ.) राखीव मार्ग, डिजीटल वाहतुक व्यवस्थापनासाठी जीपीएस अनुकूल पथदिवे, वाहतुक सिग्नल्स, दिशादर्शक व सुचना फलक, ई. व्हेईकल पार्किंग व चार्जिंग स्टेशन्स इ.
भाविकांसाठी मुलभूत सुविधाः- स्वच्छता गृहे, स्त्री, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छता गृहांची निर्मिती व अस्तित्वात असलेल्या सुविधांची दुरुस्ती, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, आर.ओ. प्लांट, टॅंकर व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, माहिती केंद्र स्थापणे जेथून भाविक-पर्यटकांना माहिती व मार्गदर्शन मिळू शकेल. या शिवाय तीन लाख लोक राहू शकतील अशा क्षमतेची तंबू शिबिरे, धर्मशाळा दुरुस्ती करणे, अशा स्थळांजवळ व तीर्थक्षेत्रांजवळ अन्नक्षेत्र उभारणे हॉटेल व लॉजसाठी सल्लागार सेवा व त्यासाठी क्यू आर कोड बुकिंग सेवा,
सुरक्षा व्यवस्थाः- २४ तास निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन द्वारे देखरेख, तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारणे व नियंत्रण कक्ष स्थापित करणे, आपत्ती प्रतिसाद दल स्थापित करणे व अग्निशमन केंद्र, आरोग्य सेवा पथके सज्ज ठेवणे, महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन, महिला पोलिसांची पथके तैनात करणे, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेटींग, सेप्रेशन वॉल्स, सुरक्षा मार्ग इ. व्यवस्था करणे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करणे. त्यात हेलिपॅड उभारणी, विश्रामगृह इ.
पर्यटन नियोजनः वेरुळ लेणी व मंदिर सजावट व प्रकाश योजना, दर्शनाचे वेळापत्रक नियोजन करणे, अधिकृत मार्गदर्शन व बहुभाषिक माहिती, स्थानिक तीर्थक्षेत्र व्यवस्थापन, दर्शन वेळापत्रक रियल टाईम उपलब्ध करणे. मोफत वायफाय सुविधा, पर्यटकांसाठी माहितीचे ॲप व पोर्टल्स तयार करणे, क्यू आर कोड व व्हर्च्युअल गाईड सुविधा.स्थानिक विक्रेत्यांना अधिकृत स्टॉल्स उपलब्ध करणे, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, स्थानिकांना रोजगार संधी निर्माण करणे. इ. बाबींचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींच्या सुचना
आ. प्रशांत बंब यांनी तयार केलेला आराखडा हा सुविधांच्या विकासासाठी असून त्याचा उपयोग आपल्या जिल्ह्यातील पर्यटन वाढावे यासाठी व्हावा. तसेच हा आराखडा सर्वसमावेशक असावा,अशी सुचना त्यांनी केली. तसेच आराखडा अंतिम करतांना ज्या ज्या जिल्ह्यात कुंभमेळा विकासाची कामे होत आहेत तेथील आराखड्यांचाही अभ्यास करावा, अशीही सुचना त्यांनी केली.आ. रमेश बोरनारे यांनी सांगितले की, नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ्यानिमित्त येणारे भाविक हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या वैजापूर तालुक्यातून येतील. त्यामुळे वैजापुर तालुक्यातील तसेच नाशिक कडून येणाऱ्या रस्त्यांची विकासकामे यात समाविष्ट करावीत.
आ. विक्रम काळे म्हणाले की, आराखड्यात पार्किंग स्थळे मुख्य देवस्थानापासून लांब (किमान ४ किमी) अंतरावर असली तरी तेथून भाविकांची ने आण करण्यासाठी अंतर्गत सार्वजनिक बस वाहतुक सुविधा असावी.खा. डॉ. कल्याण काळे म्हणाले की, सुविधा विकासांमध्ये स्थानिक उत्पादनांच्या विक्री, स्थानिकांना रोजगार याबाबींचा समावेश असावा तसेच वैजापूर परिसराचाही यात समावेश करावा,असे त्यांनी सांगितले.
खा. डॉ. कराड म्हणाले की, वेरुळ परिसराप्रमाणेच भद्रा मारोती परिसरातही भाविक येतील त्यामुळे भद्रा मारोती या क्षेत्राचाही या आराखड्यात समावेश करावा. मनपा क्षेत्रात नियोजन केलेल्या कामांचा तपशिल सादर करावा,अशी त्यांनी सुचना केली.इमाव मंत्री अतुल सावे यांनी सुचना केली की, सादर केलेल्या आराखड्यात दिलेल्या बाबींचा तपशिल देण्यात यावा. पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्या. पर्यटनावर भर देतांना रस्ते विकास व वीज वितरण, ट्रान्फार्मर व विद्युत खांबांचे स्थानांतरण अशा बाबींचाही समावेश या आराखड्यात करण्यात यावा.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात समाविष्ट कामांमुळे आपल्या जिल्ह्याचा शाश्वत विकास साधला जावा, यादृष्टीने कामांचे नियोजन करा. तसेच यानिमित्त येणाऱ्या पर्यटकांपर्यंत आपला जिल्हा पोहोचविण्याची ही संधी आहे. यानिमित्त पर्यटनाच्या क्षेत्रात आपला जिल्हा पुढे कसा नेता येईल हे पहा,असे त्यांनी सांगितले. पर्यटकांसाठी सुविधा देतांना त्यांना सुरक्षित वातावरण देण्यास प्राधान्य द्यावे.येणारे भाविक, पर्यटक हे शहरात येऊनच जातील, त्यामुळे इतक्या पर्यटकांचा सामावून घेण्याइतपत सुविधा आपल्याकडे असावयास हव्या यादृष्टीने नियोजन करा व तातडीने अंतिम प्रस्ताव तयार करा,असे निर्देश त्यांनी दिले.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले तर नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी सूत्रसंचालन केले.