सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • ७ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन
  • एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  • देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
 विश्लेषण

गौतम अदानी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

डिजिटल पुणे    10-12-2024 16:44:55

मुंबई : अदानी उद्योग समुहाचे संस्थापक तथा उद्योगपती गौतम अदानी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर गौतम अदानी यांनी प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

उद्योजक गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दीड तासांच्या चर्चेत उद्योग, रोजगार आणि प्रकल्पांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. अदानी समूह सध्या नवी मुंबई विमानतळ आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवत आहे. धारावी प्रकल्पावरून विरोधकांनी मुंबईतील जमिनी अदानींना देत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, फडणवीसांनी विभागांना 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करण्याचे आदेश देत पारदर्शकता, गतिशीलता आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प अदानी ग्रुपकडून केला जात आहे. या प्रकल्पाला शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेसनं कडाडून विरोध केला आहे. दुसरीकडं संसदेतदेखील अदानींच्या प्रकरणावरून विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या भेटीबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

अदानींवरील मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील न्यायालयात आरोप करण्यात आले. हे आरोप अदानी यांनी फेटाळले आहेत. असं असलं तरी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानींवरील आरोपांची चौकशी करून अदानी यांच्या अटकेची मागणी केली. या मुद्द्यावरून संसदेत रोज गदारोळ होत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस तथा खासदार प्रियांका गांधी-वड्रा या मंगळवारी संसदेत पोहोचल्या. तेव्हा त्यांच्यासोबत एक बॅग होती. त्या बॅगवर 'मोदी-अदानी भाई-भाई', असं लिहिलं होतं. प्रियांका गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, "आम्ही अदानींचा मुद्दा संसदेत का उपस्थित करू नये. आम्ही पहिल्यांदाच संसदेत निवडून आलो आहोत. या अधिवेशनात आम्ही अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहभागी होताना पाहिलं नाही. संसदेचं कामकाज सुरू नसल्यामुळं चर्चेत सहभागी होता येत नाही".

विरोधकांवर भाजपाचा निशाणा : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात सोमवारी मोदी-अदानी यांचे मुखवटे घातलेल्या दोन लोकांशी संवाद साधला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे हे कृत्य लोकशाहीचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती