मुंबई : तिखट आणि गोड पाण्याची जमलेली चव पाणीपुरीची लज्जत वाढवते. प्रेमातून आणि रुसव्या फुगव्यातून नात्यांची जमलेली अशीच चटकदार ‘पाणीपुरी’चाखायची असेल तर १५ नोव्हेंबरला येणारा ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट तुम्हाला पहावा लागेल. एस.के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या ‘पाणीपुरी’ चित्रपटाचे संजीवकुमार अग्रवाल निर्माते आहेत. तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.
पाणीपुरीची लज्जत तिखट गोड पाण्यात सामावलेली असते. सहजीवनात नात्यांचंही तसंच असतं. मुरलेल्या नात्याची अशीच खुमासदार गोष्ट असलेल्या ‘पाणीपुरी’ चित्रपटात नर्म विनोदी, खेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत या जोड्यांच्या प्रेमाची परिणीती, त्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा दाखविण्यात आली आहे. सहजीवनाची ही गंमत उलगडणारा ‘लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट’ सांगणारा ‘पाणीपुरी’ चित्रपट आपलं मनोरंजन नक्की करणार आहे.
मोजायला गेल्या तर कालांतराने नात्यात खूप गोष्टी बदलतात, पण तेच नातं मुरतं तेव्हा अधिक गोड होतं हाच विचार घेऊन मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे,प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर,अभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून ‘पाणीपुरी’ ची चव चाखायला देणार आहेत.
चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.