सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

सूक्ष्म आशंका (भाग ४)

डिजिटल पुणे    04-11-2024 10:20:14

सूक्ष्म आशंका (भाग ४)

 

अरे जे जालेचि नाही | त्याची वार्ता पुससी काई | तथापि सांगो जेणे काही | संशय नुरे ||८/३/१||

अरे ! जे कधी उत्पन्न झालेच नाही त्या दृश्य विश्वाबद्दल विवेचन करा असे म्हणतोस ! ते कसे करता येईल ? तरीही तुझ्या शंका समाधानासाठी काही विवेचन सांगतो.

जग हे ब्रह्माचे वास्तविक नसलेले प्रगटीकरण (विवर्त) आहे. ब्रह्म परिवर्तीत होत असल्याचे वाटते तरी तो केवळ आभास आहे. ब्रह्म हे अपरिवर्तनीय आणि अजन्मा आहे. दृश्य जगत हे वास्तविक नाही. आठव्या दशकाच्या तिसऱ्या समासात हा विवर्तवाद समजून सांगण्यासाठी श्रीसमर्थ अनेक दृष्टांत सांगतात. १.कमी प्रकाशात दोरीवर सापाचा भास होतो. साप काही खरा नसतो. २.पाण्यावर तरंगांचा भास होतो ३.सूर्यामुळे मृगजळ भासते ४.कल्पनेने स्वप्न दिसते ५.शिंपल्यावर चांदीचा भास होतो. ६.पाण्यावर काही काळ बर्फ साठते. ७.माती असून भिंत भासते. ८.समुद्रावर लाटा भासतात. ९.डोळ्यातील बाहुलीमुळे पदार्थ दिसतात १०.सोन्यावर दागिने भासतात ११.तंतुमुळे धागे असून वस्त्र भासते १२.कासवाने हातपाय पसरले तर नवीन काही वस्तूचा भास होतो १३.तूप थिजल्यावर वेगळा पदार्थ भासतो. १४.खाडीतील समुद्राचे पाणी उडाले की मीठ तयार होते. तेव्हा नवीन काही निर्माण झाल्याचा भास होतो. १५.बिंबाचे प्रतिबिंब पडले तर नवीन वस्तू आहे असे वाटते. १६.पृथ्वीतून झाड उगवते तरी ते पृथ्वीपेक्षा वेगळे असल्याचे भासते. १७.झाडाचीच छाया पडते तरी छाया म्हणून वेगळी भासते १८.धातू धातुपणाने एकच असला तरी त्यांच्या रंगाने ते कमीजास्त मूल्याचे मानले जातात.

एवढे दृष्टांत दिल्यावर समर्थ सांगत आहेत की जे अद्वैत आहे त्यात द्वैत असू शकत नाही. तेथे द्वैत असल्याचा केवळ भास होतो. अर्थात अद्वैताचा अनुभव सांगण्यासाठी द्वैताचा आधार घ्यावा लागतो. अज्ञानामुळे जे मुळात नाही ते दिसते. भ्रमाने भ्रमरूप विश्व भासते. अनुभवाला येते. या दृश्यात कल्पनेखेरीज काही नाही. दृश्य पदार्थाचा आधार घेऊन दृष्टांत द्यावा लागतो. हजार तोंडाच्या शेषालाही त्या सद्वस्तुचे वर्णन करणे शक्य नाही. त्या भगवंताने या अनंत विश्वाची निर्मिती केली आहे, सर्वकर्ता ईश्वरापासून विश्वाचा विस्तार झाला आहे. त्या ईश्वराच्या अंगी अनंत प्रकारच्या शक्ति आहेत.त्या मूळपुरुषाचि वोळखण | ते मूळमायाचि आपण | सकळ काही कर्तेपण | तेथेचि आले ||८/३/१४|| त्या अनंत शक्तीने संपन्न असा तो ईश्वर हा मूळ पुरुष होय. मूळ माया हे त्या मूळ पुरुषाचे दुसरे नाव आहे. कारण मूळमायेची ओळखण म्हणजे मूळपुरुषाची ओळखण होय. सगळे कर्तेपण मूळमायेमध्ये असते.

कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते – कार्य, कारण आणि कर्तृत्व यांचे मूळ प्रकृती हीच आहे.

साधकाचा अनुभव आणि सिद्धांना येणारा शुद्ध परमात्म्याचा अनुभव यात फरक आहे. सिद्धांचा अनुभव उघडपणे सांगणे शक्य नसते. अन्यथा साधनाची हानी होत्ते. एरवी विचार केला तर हे दृश्य विश्व खरे नाही. देवापासून हे विश्व निर्माण झाले हा विचार सर्वांना योग्य वाटतो. पण ज्या देवाने विश्व निर्मिले त्याला ओळखणे महत्वाचे आहे.

कथाव्यास, सद्गुरुचरणरज श्री. दामोदर रामदासी, पुणे.

श्रीमद् भागवत कथा, श्रीराम कथा

(रामदासी मठ, नवगण राजुरी, जि. बीड)


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती