सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 शहर

२१ व्या पशुगणनेस सोमवारपासून आरंभ

डिजिटल पुणे    23-11-2024 10:18:49

पुणे : राज्यात एकविसाव्या पशुगणनेस सोमवार २५ नोव्हेंबरपासून आरंभ होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहसंचालक सुषमा जाधव यांनी कळविली आहे. सर्व पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशुंची अचूक व योग्य ती माहिती देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रनिहाय कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर-कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या राज्यात आढळणाऱ्या १६ पशुधन प्रजाती व कुक्कुटादी पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचे लक्षणीय योगदान आहे. शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकीची आवश्यकता असून ही माहिती गणनेच्या स्वरुपात गोळा केली जाते. पशुधनामध्ये महाराष्ट्र संपन्न राज्य असून देशामध्ये ७ व्या क्रमांकावर आहे. तसेच कुक्कुट व कुक्कुटादी पक्षी यामध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. 

पशुधनाच्या निरंतर विकासासाठी चांगल्या योजना आखण्यासाठी पशुगणना महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. पशुपालन पूरक उत्पन्ननिर्मिती बरोबरच दूध, अंडी व मांस ही पशुधन उत्पादने पोषक आहाराचा महत्त्वाचा स्रोत आहे. 

देशात १९१९ पासून दर ५ वर्षानी पशुगणना घेण्यात येत आहे. २०१९ मध्ये २० व्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. २० व्या पशुगणनेच्या अहवालानुसार राज्यामध्ये एकूण ३ कोटी ३० लाख ८० हजार पशुधन असून मागील पशुगणनेच्या तुलनेत १.८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

कुटुंब घरगुती उद्योग व इतर संस्थांकडून पाळलेल्या गायवर्ग, म्हसवणे, मिथुन, याक, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी जसे की कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग तसेच इतर कुक्कुटपक्ष अशा सोळा प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय ( पॅस्टोरल कम्युनिटी) यांची देखील माहिती गोळा करण्यात येणार आहे, असेही श्रीमती जाधव यांनी कळविले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती