पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे व पर्वती विधानसभा मतदारसंघात अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावलेत. त्याची संपूर्ण राज्यात खमंग चर्चा रंगली आहे.
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी निवडणूक झाली. त्यानंतर आता उद्या शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. पण तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून पुण्यात पोस्टर्स लावलेत. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते संतोष नांगरे यांनी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात यापैकी एक पोस्टर लावले होते. त्यावर विकासाचा वादा अजितदादा, मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे लिहिण्यात आले होते. पण आता हे बॅनर काढण्यात आल्याची माहिती आहे.
महायुतीचा CM पदाचा चेहरा अद्याप जाहीर नाही
उल्लेखनीय बाब म्हणजे सत्ताधारी महायुतीने अद्याप आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नाही. उद्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा चेहरा घोषित होण्याची शक्यता आहे. त्यातच हे पोस्टर्स सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक 4 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. पण मुख्यमंत्रीपद अजूनही त्यांच्यापासून दूर आहे. त्यांनी स्वतः अनेकदा आपली मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण अजूनही हा योग आला नाही. आता उद्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर त्यांचा उल्लेख केला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 149 जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवसेनेने 81 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 59 जागा लढवल्या. काँग्रेसने 101, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 95 आणि शरद पवार गटाने 86 जागा लढवल्या. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट 50 जागांवर तर शरद पवार गट आणि अजित पवार गट 37 जागांवर एकमेकांपुढे उभे टाकलेत.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बुधवारी सरासरी 65.11 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे सत्तासुंदरी कुणाच्या गळ्यात विजयी माळ घालणार? हे उद्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे.