बारामती : संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष हे बारामतीच्या निकालावर लागलेलं होतं. अखेर बारामतीच्या निवडणुकांचा निकाल आता हाती आला असून यंदाच्या या निवडणुकीमध्ये काकांचा विजय झालेला आहे. कारण ही लढत एकाच कुटुंबातील काका आणि पुतण्या यांच्यातील म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यातील होती. बारामतीच्या जनतेने अजित पवारांनाच कौल दिल्याचं यंदाच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होत आहे.
दादांचा विजय
अजित पवारांनी यंदाच्या वैधानसभा निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतले होते. अखखी बारामतीचे पिंजून काढली होती. एवढेच नाही तर शेवटी शेवटी प्रचार सभेमध्ये बोलताना भावनिक आवाहन सुद्धा अजित पवार यांनी केलं होतं.” लोकसभेला ताईला निवडून दिलं आता विधानसभेला दादाला निवडून द्या !”असं ते सभेमध्ये बोलताना म्हणाले होते. आता त्यानुसारच बारामतीकरांनी दादांना निवडून देत अजित पवार यांना साथ दिल्याचे दिसून येत आहे.
प्रतिष्टेची लढाई
दुसरीकडे ही लढाई केवळ अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये नव्हती तर ही खरी लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी असल्याचे बोलले जात होतं. कारण मातब्बर राजकारणी म्हणून शरद पवार यांचे नाव राज्यामध्ये घेतलं जातं मात्र अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर बरेच आरोप करण्यात आले होते. त्यामुळे हे आरोप खोडून काढण्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता आणि अखेर हा विजय अजित पवार यांनी खेचून आणल्याचं बोललं जात आहे.