कोल्हापूर : कोल्हापुरातील ‘माधुरी’ हत्तीचा विषय सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. पण या संवेदनशील प्रकरणाची खरी पार्श्वभूमी जाणून न घेता, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी केवळ भावनिक मुद्दे आणि पेड अजेंडा पुढे रेटत कोल्हापूरच्या जनतेविरोधात एक प्रकारची मोहीमच चालवली आहे.
माधुरी हत्ती प्रकरण काय आहे?
‘माधुरी’ नावाची मादी हत्ती गेली 30 वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरातील नांदणी मठात आहे. ती धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होणारी हत्ती म्हणून अनेकांचा भावनिक भाग बनली आहे. नांदणी मठ व्यवस्थापनानुसार, माधुरीची सर्व कायदेशीर कागदपत्रे वन विभागाकडे नोंदलेली आहेत. तिला वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केली जाते, योग्य आहार, विश्रांती आणि फिरण्यासाठी मोकळं क्षेत्र मिळतं.
माधुरीला वंतारा येथे का व कशी हलवण्यात आली?
2023-24 दरम्यान काही पेटा (PETA) या प्राणीप्रेमी संघटनेने माधुरीवर कथित क्रूरतेचे आरोप करत तिला तिच्या निसर्गाशी जवळच्या वातावरणात हलवण्याची मागणी केली. या तक्रारीनंतर वनविभागाने माधुरीचा तपास केला. 2025 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरीला गुजरातमधील ‘वंतारा’ (Vantara) — अनंत अंबानींच्या प्राणी पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले.
ही कारवाई रात्रीच्या सुमारास, कडक पोलिस बंदोबस्तात, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली. यामुळे स्थानिक नागरिकांना आणि नांदणी मठ प्रशासनाला कोणतीही सुस्पष्ट पूर्वसूचना मिळाली नव्हती. ही अचानक झालेली कारवाई, आणि तिच्या पार्श्वभूमीतील “अचानक जलद निर्णयप्रक्रिया” — याबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या.
ज्यावेळी माधुरीला कोल्हापुरातील नांदणी मठातून गुजरातला हलवण्याच्या आदेश आला, त्यावेळी गावकऱ्यांनी आणि मठाने तो तंतोतंत पाळला. माधुरीला मोठ्या दिमाखात तिथून पाठवण करण्यात आली. यावेळी अक्षरशः अख्खा गाव हळहळला. माधुरीच्या डोळ्यामध्येही आसवे होती. कदाचित माधुरीला बोलता आले असते तीने स्वतःच स्वतः बद्दल सांगितले असते. पण त्यावेळी अख्ख्या गावाला निरोप देताना तिच्या डोळ्यामध्ये जी आसवे होती ती पेटाला दिसले नसतील. माधुरीने निमूटपणे तिच्याबद्दल घेतलेला निर्णय मानला आणि जड अंतकरणाने गुजरातला रवाना झाली.
कोल्हापूरकरांचा विरोध का?
1. भावनिक नातं: माधुरी हत्ती गेली तीन दशके कोल्हापूरकरांच्या जीवनाचा भाग राहिली आहे. अनेक पिढ्यांनी तिच्याशी एक भावनिक नातं जोडले आहे.
2. कायदेशीर आणि वैद्यकीय तपासणी पारदर्शक नव्हती: अनेकांचा आरोप आहे की माधुरीवर कोणतीही क्रूरता झाली नाही, तिची नियमित काळजी घेतली जात होती, आणि तरीही तिला हटवण्यात आले.
3. स्थानिक मतांची अवहेलना: माधुरीला हलवण्याच्या निर्णयात स्थानिक नागरिक, मठ प्रशासन किंवा स्थानिक प्रतिनिधींचा सहभागच घेतला गेला नाही.
4. अचानक हस्तांतरण: रात्रौ झालेली ही हलवणूक, आणि त्यानंतरचा गोपनीयतेचा पवित्रा — यामुळे लोकांचा सरकार आणि वन विभागावर विश्वास डळमळीत झाला.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि पेड अजेंडा
या प्रकरणात सोशल मीडियावर अचानक अनेक इन्फ्लुएन्सर्सनी एकतर्फी पोस्ट्स, रील्स आणि व्हिडीओज शेअर करत माधुरीच्या कथेला अत्यंत भावनिक रूप दिलं. त्यामध्ये कोल्हापुरातील लोकांना “क्रूर”, “अमानुष” अशी विशेषणे लावण्यात आली. अनेकांनी तर कोल्हापूरच्या मठ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप केले.
या सर्व गोष्टी केवळ सोशल मीडिया चर्चांपुरत्या मर्यादित राहिल्या असत्या तर ठीक, पण हिंदुस्तानी भाऊ या इन्फ्लुएन्सरने तर मर्यादाच ओलांडली. त्यांनी कोल्हापूरच्या जनतेला सरळ सरळ शिवीगाळ केली, आणि “हे लोक राजकारणी लोकांकडून विकले गेले आहेत” असे धादांत आरोप केले. त्यांच्या व्हिडीओमुळे कोल्हापूरकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
प्रत्यक्ष भेट न देता आरोप कसे?
या कथित इन्फ्लुएन्सर्सनी स्वतः नांदणी मठ येथे कधीही भेट दिलेली नाही, त्यांनी हत्तीच्या आरोग्यविषयक कागदपत्रांचा अभ्यास केलेला नाही, ना वनविभागाशी अधिकृत संवाद साधलेला आहे. अशा परिस्थितीत एका शहराच्या संपूर्ण जनतेला क्रूर, अमानुष आणि विकले गेलेले ठरवणे हे केवळ अन्यायकारकच नव्हे, तर अविचारी आणि बदनामीकारक कृत्य आहे.
त्याच बरोबर वनतारा देखील प्राण्यांची योग्य काळजी घेते हे पेटाने कसे मान्य केले? वनतारा हे खाजगी असून अनंत अंबानीच्या अधिपत्याखाली चालवले जाते. यातील प्राण्यांचा वापर हा अनंत अंबानीच्या लग्नमध्ये देखील झाला असल्याचे फोटो आज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यावेळी हे सर्व इन्फ्लुएन्सर्स कुठे गेले होते?
माधुरीच का? चंदगड, आजऱ्यातील हत्तींकडे दुर्लक्ष का?
जर प्राणीप्रेम हाच खरा हेतू असेल, तर मग चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागात जंगली हत्ती वर्षानुवर्षे शेतीचे नुकसान करत आहेत, त्याकडे लक्ष का नाही? त्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान, जीवित धोक्याचा प्रश्न — यावर कोणीही आवाज उठवत नाही. वन विभागही अपुऱ्या उपायांवरच समाधान मानतो. मग प्रश्न पडतो — “माधुरीच का?”
कोल्हापुरकरांचा संताप आणि निषेध
या प्रकरणामुळे कोल्हापुरात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येत या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. माधुरीला हलवण्याआधी तिच्या आरोग्याचा अहवाल, व्यवस्थापनाची भूमिका, आणि कायदेशीर प्रक्रिया यांचा नीट विचार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अर्धवट माहिती आणि सोशल मीडिया ट्रायल थांबवा
माधुरी हत्तीच्या विषयावर प्रामाणिक चर्चा होणे गरजेचे आहे. पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी केवळ प्रसिद्धीसाठी किंवा कॉर्पोरेट अजेंड्यासाठी कोल्हापुरकरांविरोधात अपमानजनक विधाने करणं — हे अत्यंत निंदनीय आहे. कोणतीही सत्य माहिती न घेता केलेले आरोप हे कोल्हापूरच्या सन्मानावर आघात करणारे आहेत.कोल्हापुरचा अपमान सहन केला जाणार नाही. सत्य समजून घ्या, अफवांना थारा देऊ नका.