नवी दिल्ली : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जुने महाराष्ट्र सदन येथे भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशांचे उपस्थितांसमोर वाचन करण्यात आले.याप्रसंगी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र.उपसंचालक मनिषा पिंगळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व कामे प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे संदेश
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त पाठविलेल्या संदेशात राज्यपालांनी नागरिकांचा सक्रिय सहभाग, प्रामाणिक आचरण आणि पारदर्शक प्रशासन याबरोबरच सामूहिक प्रयत्नांद्वारे आपण ‘विकसित भारत २०४७’कडे वाटचाल करतो आहे असे सांगितले.
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भ्रष्टाचारमुक्त भारत संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी ही जनजागृती मोहीम अत्यंत महत्वपूर्ण आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून आपण सर्वांनी भ्रष्टाचाराविरोधी भूमिका घेत, प्रामाणिकता आणि पारदर्शक कारभारातून विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशाद्वारे केले.राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येतो. यावर्षी २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘दक्षता: आपली सामायिक जबाबदारी ’ ही संकल्पना घेऊन हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.