मुंबई : मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणारा, कोकणातील बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिक, नाटककाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत यांनी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.‘वस्त्रहरण या विक्रमी नाटकासह,इतर नाट्यकृतींच्या माध्यमातून मराठी रंगभूमीसाठीचे स्वर्गीय गवाणकर यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.
‘अभिजात मराठीचे सौंदर्य आणि सौष्ठव मालवणी बोली आणखी ठसठशीतपणे मांडते. अशा या मालवणीची नादमाधुर्यता आणि तिचा ठसका स्वर्गीय गवाणकर यांनी आपल्या नाट्यकृतींतून जगभर पोहोचविला. त्यांच्या इतर नाट्यकृती देखील वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन राहिल्या आहेत. पौराणिक ढाच्यातील ‘वस्त्रहरण’ वर्तमानातील चपखल संदर्भ घेत आजही महाविक्रमी वाटचाल करीत आहे, ही त्यांच्या लेखनाची ताकद राहीली. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी, कला-साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. गवाणकर कुटुंबीय, मराठी रंगभूमी चळवळ, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
