पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये फेब्रुवारीमध्ये शिवजयंती दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण करून फरार झालेला गजा मारणे टोळीचा सदस्य रुपेश मारणे याला कोथरुड पोलिसांनी मुळशीतील आंदगावमधून अटक केली आहे. गजा मारणे तुरुंगात असल्याने रुपेश टोळीची सर्व सूत्रे चालवत होता. रुपेश मारणे अनेक महिने लपून बसला होता, अखेर सोमवारी रात्री मुळशीतील आंदगावमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
कोथरूड येथे एका आयटी अभियंत्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात गजा मारणे टोळीवर पोलिसांनी कारवाई केली असून, गजानन उर्फ गजा मारणेचा भाऊ रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी फिल्मी स्टाईल अटक केली आहे. गजानन मारणे स्वतः पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह इतर साथीदारांना ताब्यात घेतले.ही घटना कोथरूड परिसरातील असून, एका आयटी अभियंता तरुणाला गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपींना गजाआड केले.
कोथरुड भागात १९ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. जोग हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करुन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र यानंतर रुपेश मारणे हा फरार झाला अनेक महिने तो लपून बसला होता, अखेर सोमवारी रात्री मुळशीतील आंदगावमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या वाद झाला. या वादात रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांनी संगणक अभियंता देवेंद्र जोग याला मारहाण केली. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र रुपेश मारणे फरार झाला. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले होते.
पोलिस तपासात या टोळीचा संघटित गुन्हेगारीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गजा मारणे टोळीने यापूर्वीही अनेक गुन्हे केल्याची नोंद असून, त्यांचा प्रभाव क्षेत्रात वाढत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी टोळीवर कडक नजर ठेवली असून, इतर साथीदारांच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
