मुंबई : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. ‘बेस्ट’ ही मुंबईची जीवनवाहिनी असून उपनगरीय लोकल रेल्वे, मेट्रो ट्रेन यांना प्रवाशांशी जोडण्यासाठी बस सेवा महत्त्वाची आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)च्या कुलाबा येथील आगारात मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. आर. डुबल व ए.एस. राव , मुख्य अभियंता राजन गंदेवार, मुख्य वाहतूक व्यवस्थापक रमेश मडावी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी ‘सिंगल तिकीट सिस्टीम’ आणण्यात आली आहे. प्रवासी भाड्याचे उत्पन्न जास्त असेल तर बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यासाठी हे उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी काम केले जावे, अधिक व्यावसायिक दृष्टिकोन आणला जावा. ‘बेस्ट’ सक्षमीकरणासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तत्पर आहेच, असा आश्वासक दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
कर्मचारी आनंदी तर प्रवासी सेवा अधिक कार्यक्षम
‘बेस्ट’ साठी प्रवासी सुविधा वाढवितानाच व कर्मचारी हिताचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीतील योगदान, कोविड काळातील लाभाच्या निधीची रक्कम देण्यात आली आहेत. याचबरोबर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याइतकाच बोनस ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. कर्मचारी आनंदी असतील तर ही प्रवासी सेवा अधिक चांगली कार्यक्षम राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसमुळे प्रवासाचे नवीन पर्व–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’आणि लोकल रेल्वे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नागरिकांना चांगला प्रवास मिळावा यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये निधी तरतूद केली आहे. एकेकाळी ट्राम व बग्गी धावलेल्या मुंबई शहरातील रस्त्यांवर आता या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस धावणार आहे, प्रवासाचे हे नवीन पर्व सुरू आहे. ताफ्यात समाविष्ट झालेल्यामध्ये नियमित लांब बसेसबरोबर मिडी बसेस देखील आहेत. ज्या वर्दळीच्या रस्त्यावर सहजगतीने मार्गक्रमण करतील.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक नागरिक येत असतात, शहरातील सुविधा वाढविण्यासाठी लक्ष दिले जात आहे.शासनाच्या कामाचा झपाटा मोठा असून शहराला कोस्टल रोड, अटल सेतू , मेट्रो यासह काँक्रीट रस्ते, पूल अशा जलद आणि उत्तम दळणवळण सुविधा देण्यात येत आहेत. असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.ते म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना दिवाळीपूर्वीच बेस्ट कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस दिला आहे. शासन कर्मचाऱ्यांसाठी हिताचे काम करते असून मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सफाई कर्मचारी अविश्रांत काम करीत असतात, ते खरे मुंबईचे हिरो आहेत. या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी देखील निर्णय घेतले आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उपलब्ध करणारी योजना लागू केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीबेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
ओशिवरा, गोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे देखील लोकार्पण
कुलाबा आगारासह ओशिवरा, गोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे देखील लोकार्पण करण्यात आले. यामुळे सुमारे 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज दर्जेदार प्रवास अनुभवता येईल.
मुख्यमंत्री यांच्या समवेत मान्यवरांनी क्रमांक 4068 वीर कोतवाल उद्यान कुर्ला नामफलकाच्या बस मध्ये बसून पाहणी केली, माहिती घेतली व काही अंतर प्रवास केला.
बेस्ट उपक्रमात नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचे पर्व
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा मार्फत एकूण 150 नवीन 12 मीटन लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्या प्रवर्तित होत आहेत. या बसगाड्या ‘वेट लीज’ पद्धतीने चालविल्या जाणार असून, त्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
150 इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईतील 21 मार्गावर चालविण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 21 प्रभागांचा समावेश आहे. बसगाड्यांची गुणवत्ता नियंत्रण केंद्राद्वारे नियमित देखरेख केली जाईल.
ही बससेवा अंधेरी (प.), जोगेश्वरी (प.), कुर्ला (पूर्व व पश्चिम), बांद्रा (प.), कांदिवली (प.) आणि बोरिवली (प.) या उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे.
या बसगाड्या मेट्रो लाईन क्र. 1,2A, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) या प्रमुख मेट्रो मार्गाशी जोडणी साधून मेट्रो प्रवाशांना अखंड शेवटच्या टप्प्यापर्यतची जोडणी उपलब्ध करून देतील.