मुंबई : नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन, जनजागृती रॅली, सोशल मीडियावर हॅशटॅगसह जनजागृती मोहीम, कार्यशाळा तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. नशामुक्त भारत अभियानाची मुदत नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढविण्यात आली असून या कालावधीत नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
समाजातील सर्व घटकांपर्यंत नशाविरोधी संदेश पोहोचवून “नशामुक्त भारत, खुशहाल भारत” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच एनसीसी स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून अंदाजे १० कोटी लोकांपर्यंत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून पोहोचण्याचे उद्दिष्ट आले आहे.
अभियानाच्या प्रसारासाठी “नशामुक्त भारत व खुशहाल भारत” या टॅगलाईनसह तयार केलेल्या मॉस्कॉटचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड स्कॅनर बसवून सामूहिक प्रतिज्ञा घेण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
