मुंबई - महिलांना व बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोलापूर येथे महिला व बालविकास भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी निधी मंजूर करण्यात येत असून, हे भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.सोलापूर येथे महिला व बालकांसाठी सुविधा उपलब्ध होण्यासाठी उत्तर सदर बाजार येथे ३३९० चौ.मी. जागेवर महिला व बालविकास भवन उभारण्यात येत आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली.बैठकीस सचिव अनुपकुमार यादव, माजी आमदार दिपक साळुंखे, सहआयुक्त राहुल मोरे, सहसचिव वि. रा. ठाकूर, अवर सचिव श्री. सरदार, दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या भवनाच्या कामासाठी लागणारा आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. या वास्तूत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय, तीन नागरी प्रकल्प अधिकारी कार्यालये, महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय, बैठक कक्ष, हिरकणी कक्ष, वूमन हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन, अभिलेख कक्ष, विश्रामगृह आदींचा समावेश करण्यात येणार आहे. याचा लाभ महिलांना होणार आहे. तसेच जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्यात यावेत. असे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
या महिला व बालविकास भवनामुळे महिला आर्थिक विकास, स्वयंसहाय्यता गट, कौशल्य विकास, सल्ला-सेवा यांचे संचालन सोपे होईल, वूमन हेल्पलाईन चाईल्ड हेल्पलाईन, समुपदेशन व सहाय्य केंद्राद्वारे घरगुती हिंसा, छळ, अत्याचारासंबंधी तक्रारींचे निवारण आदी सहाय्य मिळणार आहे.