सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 शहर

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकारातून आषाढी वारी नियोजन बैठक; वारकऱ्यांच्या सोयीसुविधांवर विशेष भर

गजानन मेनकुदळे    05-05-2026 17:51:50

पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आगमन करणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी पुण्याच्या महापौर मा. मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकारातून आज विशेष आढावा बैठक पार पडली. लाखो वारकऱ्यांचे पुण्यात होणारे आगमन लक्षात घेता त्यांच्या सोयीसुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी बैठकीत सर्व विभागांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, “आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला कोणतीही अडचण भासू नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.” त्यांनी विशेषतः स्वच्छता मोहीम, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले.

या बैठकीस उपमहापौर मा. परशुरामजी वाडेकर, सभागृह नेते मा. गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते मा. निलेश निकम, गटनेते मा. सोपान उर्फ काका चव्हाण आणि मा. नितीन गावडे उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त मा. पवनीत कौर, मा. प्रजित नायर व मा. ओमप्रकाश दिवटे यांनी विविध विभागांच्या तयारीचा आढावा सादर केला. तर पोलीस आयुक्त मा. संदीप भाजीभाकरे आणि पोलीस उपायुक्त मा. हेमंत जाधव यांनी वारीदरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती देत वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद याबाबत सविस्तर योजना मांडली.

बैठकीत ‘निर्मल वारी’ आणि ‘सुरक्षित वारी’ या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवर स्वच्छता, मोबाइल शौचालये, पिण्याच्या पाण्याची टाकी, आरोग्य तपासणी केंद्रे तसेच विश्रांतीसाठी तात्पुरत्या निवारा व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी आळंदी आणि देहू संस्थानच्या प्रतिनिधींनीही पालखी मार्गावरील अडचणी व आवश्यक सुविधा याबाबत सूचना मांडल्या. महापौरांनी या सर्व सूचनांची दखल घेत संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

आषाढी वारी हा श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम असून, पुणे शहरातून होणारा पालखी सोहळा हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यंदा हा सोहळा अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात पार पडावा यासाठी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

#AshadhiVari #PalkhiSohala2026 #PandharpurWari #PunePMC #PuneMayor #NirmalWari #SafeWari #PuneCity #Alandi #Dehu


 Give Feedback



 जाहिराती