सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 क्राईम

फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष; बारामतीत व्यापाऱ्याची लूट, पोलिसांच्या पाठलागानंतर 4 आरोपी अटकेत

डिजिटल पुणे    06-05-2026 15:56:24

बारामती (पुणे): फेसबुक मार्केटप्लेसवर स्वस्त दरात गहू देण्याचे आमिष दाखवत एका व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून त्याच्यावर शस्त्राचा धाक दाखवत लूट करणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे 8 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवी संजय माने, श्रीकांत अर्जुन घुले, अभिषेक भाऊसो ठोंबरे आणि अतुल मोहन भोलणकर यांचा समावेश आहे. फिर्यादी सूरज सरजेराव गावडे (वय 27, रा. तासगाव, जि. सांगली) हे गव्हाच्या पिठाचा व्यवसाय करतात. त्यांनी फेसबुकवर “बाजारभावापेक्षा स्वस्त गहू” अशी जाहिरात पाहून त्यावर संपर्क साधला होता.

आरोपींनी बनावट फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून गावडे यांच्याशी संपर्क साधत त्यांना बारामतीत बोलावले. 4 मे रोजी गावडे हे आपल्या छोटा हत्ती टेम्पोसह रोख रक्कम घेऊन बारामतीत आले. आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून शेवटी निर्जन भागात नेले.

तेथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी पिस्तूलाचा धाक दाखवत गावडे आणि त्यांच्या चालकाला मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीव घेण्याची धमकी देत आरोपी फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांची माहिती आणि सायबर तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. विविध भागात नाकाबंदी करत भिगवण परिसरात थरारक पाठलाग करून तिघांना अटक करण्यात आली, तर चौथ्या आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे, दागिने, घड्याळ आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईमुळे ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती