पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल सुमारे दोन टक्क्यांनी घसरल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९०.५६ टक्के इतका नोंदवला गेला आहे. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांतील १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून तेथील निकाल ९७.६२ टक्के लागला आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के नोंदवला गेला. पुणे विभागाचा निकाल ९४.२४ टक्के तर मुंबई विभागाचा निकाल ९४.९७ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाने ९५.४७ टक्के निकालाची नोंद केली. नागपूर विभागाचा निकाल ८९.०७ टक्के, अमरावती ९०.५० टक्के, नाशिक ९०.५३ टक्के आणि लातूर विभागाचा निकाल ८८.४२ टक्के लागला.
यापूर्वी बोर्डाकडून निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र संकेतस्थळांवरील वाढता ताण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार असून अधिकृत संकेतस्थळांसह विविध पोर्टलवर गुणपत्रिका उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच एसएमएसद्वारेही निकाल पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये MHSSC असा मजकूर आणि सीट नंबर टाइप करून 57766 या क्रमांकावर पाठवल्यास निकाल मोबाईलवर मिळणार आहे.
दरम्यान, निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.