सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
  • महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींनी पुन्हा मारली बाजी
 जिल्हा

‘एआय उपयुक्त, पण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’ ;‘टेक वारी 2.0’ कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ परिसंवादात मान्यवरांचे मत

डिजिटल पुणे    08-05-2026 12:35:18

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही कला, चित्रपटसृष्टी तसेच सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त तांत्रिक साधन असले, तरी मानवी भावना, संवेदना आणि सर्जनशीलतेची जागा ती कधीच घेऊ शकत नाही, असा सूर मंत्रालयात आयोजित ‘टेक वारी 2.0’ कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या परिसंवादात उमटला. कला, चित्रपट आणि शिल्पकलेतील मान्यवरांनी एआयच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना तंत्रज्ञानाचा वापर सजगतेने आणि विचारपूर्वक करण्याची गरज अधोरेखित केली.

सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित ‘टेक वारी 2.0’ अंतर्गत ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हलच्या संस्थापक आणि कलाकार बृंदा मिलर, शिल्पकार अरझान खंबाटा, चित्रपट दिग्दर्शक रोहन सिप्पी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अशोक कौल यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थि‍त होत्या.

काळा घोडा फेस्टिव्हलच्या आयोजक तथा संस्थापक बृंदा मेलर म्हणाल्या की, गेली 27 वर्ष काळा घोडा फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते आहे. या फेस्टीव्हलमध्ये सातत्यता असल्यामुळेच हा फेस्टिव्हल यशस्वी आहे. कोणत्याही खाजगी फेस्टिव्हलला जर शासनाचा पाठिंबा मिळाला तर ते काम चांगले यशस्वी  होते हेच काळाघोडा फेस्टिव्हलचे यश आहे. सुरूवातीला या फेस्टिव्हलला मर्यादा होती. आता फेस्टिव्हल शासनाच्या मदतीमुळे चांगला होत आहे याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अशोक कौल यांनी चित्रपट क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ प्रवासातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अनुभव कथन केला. सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये अॅनिमेशनचा वापर का करत नाही, असा प्रश्न विचारला जात असे. त्यानंतर त्यांनी स्वतःचे प्रशिक्षण केंद्र सुरू करून नवोदित कलाकारांना संधी दिली. “कलाकाराला शिखरापर्यंत पोहोचण्यापासून रोखणारे वारे, यशानंतर त्याच कलाकाराच्या पावलांवर डोकं टेकवतात,” असे सांगत त्यांनी कलाकारांच्या संघर्षाचे वास्तव मांडले. एआयवर आधारित चित्रपटांच्या वाढत्या वापराबाबत बोलताना कौल म्हणाले, “चित्रपट हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर मानवी भावनांचे माध्यम आहे. संवेदना आणि भावनिक स्पर्श नसलेला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आज वेळ वाचवण्यासाठी अनेक शॉर्टकट वापरले जात आहेत; मात्र चित्रपट हा विविध कलांचा संगम असल्याने त्यामध्ये मानवी स्पंदन टिकणे अत्यावश्यक आहे.”

चित्रपट दिग्दर्शक रोहन सिप्पी यांनी एआयला चित्रपटसृष्टीसमोरील नवे आव्हान मानले. “प्रत्येक काळात चित्रपट क्षेत्रासमोर नवी आव्हाने उभी राहिली आणि ती काळानुसार बदलत गेली. एआयचा वापर वाढत असला, तरी मानवी कौशल्य आणि सर्जनशीलतेचे महत्त्व कायम राहणार आहे,” असे ते म्हणाले. मुंबई ही देशाची चित्रपट राजधानी म्हणून अधिक सक्षम व्हावी, यासाठी चित्रपट क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शिल्पकार अरझान खंबाटा यांनी सार्वजनिक कलेचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. “पब्लिक आर्ट म्हणजे समाजाला कलेशी जोडणारा एक भक्कम दुवा आहे. धातू, दगड, काच यांपासून बनवलेली भव्य शिल्पे, भित्तीचित्रे, लाईट इन्स्टॉलेशन्स आणि स्मारके समाजाच्या सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करतात,” असे ते म्हणाले. शिल्पकलेतही एआयचा वापर वाढत असला, तरी आयकॉनिक कलाकृती निर्माण करण्यासाठी कलाकाराची स्वतंत्र दृष्टी आणि संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसंवादात सहभागी मान्यवरांनी एआयचा वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता व्यक्त केली. “एआय मदत करू शकते; मात्र त्याचा वापर कधी, कसा आणि किती करायचा याचे भान असणे आवश्यक आहे. पूर्णपणे एआयवर अवलंबून राहिलो, तर कला आणि चित्रपट यांचे मूळ अस्तित्व धोक्यात येऊ शकते,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी यांनी  एआयमुळे विविध प्रणाली, संस्था आणि सर्जनशील परिसंस्थांमध्ये होत असलेल्या बदलांविषयी, सामाजिक आशय आणि भावनिक स्तरांवर आधारित कथनशैली, तंत्रज्ञानाचा कथानक आणि प्रेक्षकांच्या अनुभवावर होणारा प्रभाव असे विविध प्रश्न विचारून शासनातही एआयचा वापर करताना घ्यायची खबरदारी याबाबत अधिक चांगली मुलाखत रंगवली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्रेक्षकांनी मान्यवरांना विविध प्रश्न विचारत संवाद साधला.


 News Feedback

Digital Pune
umakant pampat
 08-05-2026 19:52:45

Very nice. At present each and every government, semi government non government, ie technical educational institute is very disturbed.

 Give Feedback



 जाहिराती