सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 DIGITAL PUNE NEWS

देऊळ बंद 2 पाहायला गेलेल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज! प्रवीण तरडेंकडून ‘देऊळ बंद 3’ची घोषणा

डिजिटल पुणे    23-05-2026 11:00:10

पुणे : तब्बल 11 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटातून पुन्हा एकदा श्रद्धा-अंधश्रद्धेवर भाष्य करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे, दुसऱ्या भागाच्या शेवटीच ‘देऊळ बंद 3’ची घोषणा करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत 2.45 कोटींचं नेट कलेक्शन केलं. गुरुपुष्यामृत योग साधत चित्रपट गुरुवारी पहाटे प्रदर्शित करण्यात आला होता. सकाळच्या शोसाठीही प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी केली होती.

‘देऊळ बंद 2’च्या शेवटी प्रेक्षकांना एक खास सरप्राईज पाहायला मिळतं. पहिल्या भागातील लोकप्रिय पात्र राघव शास्त्रीची पुन्हा एन्ट्री होत असून अभिनेता गश्मीर महाजनी पुन्हा एकदा त्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट होतं. सोशल मीडियावर या सीनचे व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये राघव शास्त्री अमेरिकेत आपल्या कंपनीत काम करत असताना त्याला अचानक एक फोन येतो. फोनच्या दुसऱ्या बाजूने स्वामींचा आवाज ऐकू येताच तो थक्क होतो. “मी अक्कलकोटहून स्वामी समर्थ बोलतोय,” असं म्हणत स्वामी त्याच्याशी संवाद साधतात. त्यानंतर अमेरिका, नास्तिकता आणि श्रद्धेवर आधारित त्यांच्यातील संवाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. शेवटी स्क्रीनवर ‘देऊळ बंद 3’ची घोषणा होताच थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाल्याचं पाहायला मिळालं.

पहिल्या भागात राघव शास्त्रीच्या विचारसरणीत बदल घडवणारे स्वामी दुसऱ्या भागात एका महिला शेतकऱ्यासोबत दिसले. आता तिसऱ्या भागात पुन्हा एकदा राघव शास्त्री आणि स्वामी यांची भेट कशी रंगणार, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही या घोषणेनंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे


 Give Feedback



 जाहिराती