पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ अत्यंत भावपूर्ण, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक वर्षे निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या दीर्घ सेवाकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी श्री. विठ्ठल कोळेकर वरिष्ठ लिपिक, सौ. सुनीता आत्रे टेक्निकल लॅब असिस्टंट, श्री. चंद्रकांत कांबळे वरिष्ठ लिपिक तसेच श्री. अविनाश महापुरे शिपाई यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या कार्यकाळात त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी केलेले परिश्रम, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सहकार्याची भावना यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवा, शिस्त आणि संस्थेप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव केला. “संस्थेची खरी ओळख ही तिच्या कर्तव्यदक्ष आणि मूल्यनिष्ठ कर्मचाऱ्यांमुळेच निर्माण होते. कर्मचारी हेच संस्थेचे खरे बळ असतात,” असे सांगत त्यांनी सर्वांना निरोगी, आनंदी आणि समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतात भारती विद्यापीठाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत महाविद्यालयातील सहकार्य, आपुलकी, जिव्हाळा आणि अनेक अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. अनेक कर्मचाऱ्यांच्या भावना व्यक्त होत असताना कार्यक्रमाचे वातावरण काही क्षण भावूक झाले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार, डॉ. सोनाली कदम, डॉ. विजया पवार, प्रा. प्रणोती काळे, डॉ. सविता इटकरकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली कदम आणि प्रा. मुग्धा राणे यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रम सन्मान, कृतज्ञता आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला.