धाराशिव : पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्येला तब्बल 20 वर्षे 13 दिवस पूर्ण झाले असून, या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे की, "माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. 20 जून रोजी न्यायदेवता न्याय करेल आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला, त्यांच्यावर फैसला होईल, अशी अपेक्षा आहे."
"हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती आणि पैशाच्या जोरावर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या आणि रक्ताच्या नात्याचाही घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्धचा संघर्ष आहे," असेही त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले, "आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या, पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. 20 जूनला येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आशेने पाहत आहेत."
न्यायाला उशीर झाला असला तरी आता त्यावर भाष्य करण्यापेक्षा पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांच्या खुन्यांना कठोर शिक्षा व्हावी, एवढीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.20 जून रोजी होणाऱ्या या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले असून, दोन दशकांपासून न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्याला अखेर न्याय मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.