चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. जिवती तालुक्यातील घोडनकप्पी गावात खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचू न शकल्याने प्रसूतीनंतर एका २५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. संगीता गेडाम असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
तेलंगणा सीमेलगत असलेल्या घोडनकप्पी या दुर्गम गावात अद्यापही पक्का रस्ता उपलब्ध नाही. संगीता गेडाम यांची आठव्या महिन्यात घरीच प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने कुटुंबीयांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. मात्र, गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने रुग्णवाहिकेला गावापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत मूलभूत सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले आहे. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत होती. गावात रस्त्याची सुविधा नसल्याने प्रसूतीपूर्व काळात माहेरी जाण्याचा किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राहण्याचा सल्लाही तिला देण्यात आला होता. मात्र, त्यांनी त्यास नकार दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.