सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आई, साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; तुम्हाला सोडणार नाही, खासदारांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिल्याचा संजय राऊतांचा दावा
  • NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी
 जिल्हा

'माधुरी' हत्तीणीच्या पुनरागमनाची तयारी अंतिम टप्प्यात; महिनाभरात नांदणी मठात परतण्याची शक्यता

डिजीटल पुणे    16-06-2026 16:17:13

कोल्हापूर : नांदणी मठातील भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या 'माधुरी' उर्फ महादेवी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे. येत्या महिनाभरात माधुरीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी आवश्यक हालचाली वेगाने सुरू असून, तिच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महादेवी हत्तीणीच्या वास्तव्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधा, सुरक्षितता आणि देखभालीची व्यवस्था तपासण्यासाठी वनताराची तज्ज्ञ टीम नुकतीच नांदणी येथे दाखल झाली होती. या पाहणीदरम्यान नांदणी मठ प्रशासन आणि वनतारा यांच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पुनर्वसन केंद्रातील सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित उच्चस्तरीय समितीकडे (HPC) आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असून, त्यानंतर माधुरीच्या पुनरागमनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिनसेन संस्थान मठ, नांदणी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत या घडामोडींना दुजोरा दिला आहे. महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वनतारा यांच्यात सकारात्मक समन्वय सुरू असल्याचे सांगत, पुढील एक महिन्यात माधुरीच्या परतीची आशा अधिक बळकट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. "लाखो भाविकांच्या प्रेमाची साक्ष असलेली माधुरी पुन्हा नांदणीच्या भूमीत यावी, ही सर्वांचीच प्रार्थना आहे," असेही मठाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

माधुरी हत्तीणीला २८ जुलै २०२५ रोजी वनतारा येथे हलविण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूरसह राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून तिच्या पुनरागमनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. आता या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसत असून, लवकरच माधुरी पुन्हा एकदा नांदणी मठाच्या परिसरात भाविकांच्या भेटीला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती