सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; विधानसभेत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं
 जिल्हा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ताथवडे येथील २० हेक्टर जमीन हस्तांतरणास महसूल मंत्र्यांची मान्यता

डिजीटल पुणे    23-06-2026 12:55:10

मुंबई : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे (जि. पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री यांच्या अंतिम मान्यतेनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या अनुषंगाने गृह विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ताथवडे येथील वळूभाता प्रक्षेत्र येथे ६७ हेक्टर ९४ आर क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड व इतर संबंधित कार्यालयांसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर गृह विभागाने शासन निर्णय ८ सप्टेंबर २००८ मधील तरतुदींनुसार सदर जमीन हस्तांतरणाची कार्यवाही करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, कायदा व सुव्यवस्थापनाच्या दृष्टीने सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याची गरज तसेच पोलीस आयुक्तालयाच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात आली.

यापूर्वी हवेली तालुक्यातील मौजे चिखली येथील गट क्रमांक ५३९ पैकी ३ हेक्टर ३९ आर जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थान व परेड ग्राऊंड या प्रयोजनासाठी पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांना ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन ज्ञापनान्वये प्रदान करण्यात आली आहे.या प्रस्तावास महसूल मंत्र्यांची मान्यता प्राप्त झाली असून मुख्यमंत्री यांच्या मंजुरीनंतर आवश्यक शासन निर्णय जारी करून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र व सर्वसमावेशक प्रशासकीय संकुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.या बैठकीस आमदार महेश लांडगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती