सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; विधानसभेत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं
 जिल्हा

अखेर मान्सूनची दमदार एंट्री! मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

डिजीटल पुणे    23-06-2026 13:16:51

मुंबई : राज्यभरातील नागरिक आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून नैऋत्य मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा केली आहे. सध्या मान्सूनची सीमा डहाणू, वर्धा, रायपूर आणि मोतिहारीपर्यंत पोहोचली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत गुजरातच्या काही भागांसह महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील आणखी काही भागांमध्ये त्याची प्रगती होण्याची शक्यता आहे.

मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागांत मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. सायन परिसरात पावसामुळे एका बेस्ट बसमध्ये बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आणि काही ठिकाणी कोंडी निर्माण झाली. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तासांसाठी मुंबईला 'यलो अलर्ट' जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 24 ते 27 जूनदरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्ते, ओढे आणि नाले तुडुंब भरले. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण असून अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. माणगाव, म्हसळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यांत पावसाची नोंद झाली असून दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 80.87 मिमी पावसाची नोंद झाली असून देवगड तालुक्यात सर्वाधिक 126 मिमी पाऊस झाला. पुढील पाच दिवस जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने येथेही 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातही पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी भातशेती आणि पाणीपुरवठ्याची चिंता वाढली होती. मात्र, नव्याने सुरू झालेल्या पावसामुळे भात रोपवाटिकांना दिलासा मिळाला असून विहिरी, ओढे आणि जलस्रोतांमधील पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती