पुणे : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवे खुलासे समोर येत असताना आता केतन यांच्या आईने सिया गोयलबाबत काही धक्कादायक दावे केले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सिया गोयलला त्यांनी सून म्हणून स्वीकारले होते. ती अनेकदा त्यांच्या घरी आली होती आणि त्यावेळीच तिला घरातील नियम स्पष्टपणे सांगितले होते.
केतन यांच्या आईच्या म्हणण्यानुसार, सिया पूजा, वाढदिवस आणि डिनर अशा विविध प्रसंगी त्यांच्या घरी आली होती. त्यावेळी त्यांनी सियाला, "आमच्या घरात मद्यपानाला परवानगी नाही. लग्नानंतर तुला कोणत्याही पार्टीला पाठवणार नाही," असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, सिया मद्यपान करते ही बाब तिच्या कुटुंबीयांनी त्यांच्यापासून लपवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी सियाची आई पूजा गोयल, भाऊ आणि आत्या यांनाही या प्रकरणात जबाबदार धरत सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. "18 जून रोजी पूजा गोयलचा मला फोन आला होता. तिने केतनला सियासोबत फिरायला का पाठवले, असा प्रश्न केला. त्यावेळी मीच तिला सांगितले की, सियाच माझ्या मुलाला घेऊन गेली होती," असेही त्यांनी सांगितले.
केतन यांच्या आईने पुढे सांगितले की, त्यांचे 20 जणांचे एकत्र कुटुंब असून सिया घरातील सर्वांशी सहज मिसळायची. ती अनेकदा त्यांच्यासोबत शॉपिंगलाही गेली होती आणि व्हिडिओ कॉलवरही नियमित संवाद साधायची. त्यामुळे तिच्या मनात असा भयंकर कट सुरू असेल, याची कोणालाही कल्पना आली नव्हती, असे त्यांनी नमूद केले.
हत्याकांडाचा तपास असा उलगडला
18 जून रोजी केतन अग्रवाल यांचा लोहगडावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला.
बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांना घटनेबाबत संशय आला.
अंत्यसंस्कारानंतर 21 जून रोजी कुटुंबीयांनी घटनास्थळी भेट देत हा अपघात नसल्याचा दावा केला.
सांत्वनासाठी घरी आलेल्या सिया गोयलला केतनची बहीण संजना हिने घटनास्थळाविषयी सविस्तर प्रश्न विचारले. तिच्या विसंगत उत्तरांमुळे संशय अधिक गडद झाला.
पोलिस तपासात सिया आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या वर्षभरात 2,004 फोन कॉल आणि 300 हून अधिक तास संभाषण झाल्याचे समोर आले.
चेतनचे मोबाईल लोकेशन वेगळे दिसत असतानाच लोहगड परिसरातील सीसीटीव्हीत हुडी, मास्क आणि हेडफोन घातलेला संशयित तरुण दिसला.
पुढील तपासात चेतनने स्वतःचा मोबाईल दुकानातील कर्मचाऱ्याकडे ठेवून त्याचा फोन घेत लोहगडावर गेल्याचे उघड झाले.
22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांनी चेतनला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला आणि त्यानंतर सिया गोयलचीही भूमिका स्पष्ट झाली.
सध्या या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत असून, आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.