सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; विधानसभेत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं
 जिल्हा

पळून जाण्याऐवजी केतनचा काटा काढला; सिया-प्रियकराची कबुली, हत्येमागचं धक्कादायक कारण उघड

डिजीटल पुणे    24-06-2026 17:04:14

पुणे : लोहगड किल्ल्यावरून तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांना दरीत ढकलून ठार मारल्याच्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या चौकशीत दोघांनी हत्येचा कट आणि त्यामागील कारण स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तपासात नवे खुलासे होत आहेत.

तपासानुसार, केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला होता आणि दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, सियाचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते. साखरपुडा मोडून प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती सियाला होती. त्यामुळे केतनचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याचा दावा पोलिस तपासात समोर आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 14 जून रोजीही केतनला लोहगडावर नेऊन हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, योग्य संधी न मिळाल्याने तो कट फसला. त्यानंतर 19 जूनला कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन असतानाही सियाने 18 जून रोजी ट्रेकला जाण्याचा आग्रह धरला. याच दिवशी चेतन आधीच लोहगडावर पोहोचला होता. योग्य संधी साधून दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर तपासाची दिशा बदलली. सांत्वनासाठी घरी आलेल्या सियाला केतनची बहीण संजना हिने ट्रेकदरम्यान घडलेल्या घटनांबाबत सलग प्रश्न विचारले. तिच्या उत्तरांमधील विसंगतीमुळे संशय अधिक गडद झाला.

त्यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतन यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी केली. गेल्या वर्षभरात दोघांमध्ये तब्बल 2,004 फोन कॉल आणि 300 हून अधिक तास संभाषण झाल्याचे समोर आले. मात्र, घटनेच्या दिवशी चेतनचे मोबाईल लोकेशन लोहगडावर नसल्याने तपास अधिक खोलवर करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हुडी, मास्क आणि हेडफोन घातलेला एक तरुण सियाच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. पुढील चौकशीत चेतनने स्वतःचा मोबाईल दुकानातील कर्मचाऱ्याकडे ठेवून त्याचा फोन घेत लोहगडावर गेल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी चेतनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सियाचाही सहभाग स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत असून, आरोपींच्या पोलीस कोठडीतून आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती