शिरवळ : मित्राचा वाढदिवस साजरा करून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या सहा तरुणांच्या कारला शिरवळ येथे भीषण अपघात झाला. भरधाव कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या मालट्रकवर आदळल्याने कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुणांचे वय १९ ते २० वर्षांच्या दरम्यान आहे.
वेदांत अर्जुन वारिंगे (१९), सोनू धीरेंद्र ठाकूर (१९), आदित्य बाळासाहेब गरुड (१९) आणि निखिल बाळू राऊत (२०) अशी मृतांची नावे आहेत. तर मयूर हनुमंत शिंदे (२०) आणि दीक्षित दयानंद पुजारी (२०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण मावळ परिसरातील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मित्राच्या वाढदिवसानिमित्त सर्व तरुण एकत्र आले होते. रात्री बारा वाजता केक कापल्यानंतर दोन वाहनांतून ते महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाले. त्यापैकी एका कारमध्ये सहा तरुण होते. शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कार दुभाजकावर आदळून तो तोडत विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकवर जोरदार आदळली.अपघाताची धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारच्या मागील सीटवर बसलेले चारही तरुण जागीच ठार झाले, तर पुढील बाजूस बसलेले दोघे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. फलटणचे पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.या प्रकरणी ट्रकचालक शिवकुमार देवांगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक मयूर शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खामगळ करीत आहेत.
वाढदिवसाच्या रात्रीच काळाचा घाला
मित्राचा वाढदिवस साजरा करून पुढील प्रवासाला निघालेल्या या तरुणांवर काही तासांतच काळाने घाला घातला. विशेष म्हणजे मृत्यूमुखी पडलेले चारही तरुण एकाच महाविद्यालयातील मित्र होते. वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी सुरू झालेला प्रवास अपघातामुळे कायमचा दु:खद आठवणीत बदलला आहे.