ठाणे : सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या असून शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू, असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
या सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक, महापौर शर्मिला पिंपोळकर, ठाणे महापालिकेचे उपमहापौर हनुमंत जगदाळे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
समारंभाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे स्मरण करत त्यांनी तमाम जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने अवकाश संशोधन, डिजिटल तंत्रज्ञान, ऊर्जा स्वावलंबन आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व गगनभरारी घेतली आहे. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रासारख्या तंत्रज्ञानाने संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर बनले असून, झिरो टॉलरन्स धोरणामुळे नक्षलवादाचा बीमोड होऊन शांतता, सुरक्षा आणि विकास हीच देशाची त्रिसूत्री बनली आहे. या राष्ट्रीय प्रवासात महाराष्ट्राने नेहमीच आघाडी घेतली असून राज्य १ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे.
बळीराजाच्या कल्याणाचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ लागू केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ९७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंदणी केली असून, जिल्हा परिषद सेस फंडातून २,१०० लाभार्थ्यांना आधुनिक शेती साहित्य, सिंचन साधने आणि महिला बचतगटांना ई-कार्टचे वाटप करण्यात आले आहे. तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून वंचित घटकातील शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे.
ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३५ हजार नागरिकांना थेट लाभ पोहोचवण्यात आला असून २६८ जणांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय मांडताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा हे दोन्ही प्रकल्प शहरासाठी गेमचेंजर ठरणार आहेत. ठाण्याच्या बाजूने दुसऱ्या बोगद्याचे कामही गतीने सुरू झाले आहे. ठाणे शहरासाठी ३०२ कोटींचा तर अंबरनाथसाठी १५० कोटी रुपयांचा मलनिःसारण प्रकल्प मंजूर झाला आहे. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी पक्की घरे उपलब्ध करून देत संपूर्ण महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. तसेच ठाण्यातील ९०० खाटांचे राज्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षात सेवेत दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ६ हजार ५९ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम कॅमेरे बसवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधारवड’ ॲप आणि संवाद वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. नशामुक्त भारत अभियानांतर्गत ठाणे पोलिसांनी ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. आजची ‘जेन झी’ ही स्मार्ट, टेक्नो-सॅव्ही आणि इनोव्हेशन करणारी पिढी देशाची खरी सुपरपॉवर असल्याचे सांगत, तरुणांनी स्टार्टअप्स, ग्रीन तंत्रज्ञान आणि एआय सोल्यूशन्सच्या माध्यमातून विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा’
या सोहळ्यात मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धे’ च्या अधिकृत लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना माती आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी, जलसंधारण मोहिमेत सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ देण्यात आली.
स्त्री दर्पण” या ई-बुकचे प्रकाशन
जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे आणि दैनिक द ग्लोबल टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण व महिला यशकथा या विषयावरील ‘स्त्री दर्पण’ या ई-बुकचे प्रकाशनही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. ही पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर विनामूल्य उपलब्ध असणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनातील उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच शैक्षणिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.