सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
  • ‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं
 शहर

‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं

डिजिटल पुणे    04-09-2026 10:54:02

पुणे : गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध करत बापट यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर टिळक रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पुणे क्राईम ब्रँचने कारवाई करत आरोपी संतोष चव्हाण याला अवघ्या तीन तासांत अटक केली.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेला ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीने आपले मत व्यक्त केले म्हणून त्याच्यावर हल्ला करणे हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

‘बापटांना ओळखत नाही, मात्र त्यांचा मुद्दा योग्य’

शरद पवार यांनी सांगितले की, सण-उत्सव हे आनंददायी वातावरण निर्माण करणारे असायला हवेत. मात्र, डीजेचा मोठा आवाज आणि रस्त्यांवर होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे उत्सवाचे गांभीर्य कमी होऊ शकते.विद्यानंद बापट यांची वैयक्तिक ओळख नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी डीजे आणि ध्वनीप्रदूषणाबाबत उपस्थित केलेला मुद्दा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून, या उत्सवातील चुकीच्या बाबींवर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याचे मत ऐकून घेणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मतभेद असतील तर चर्चा करा, हल्ला नको

एखाद्या व्यक्तीने एखाद्या विषयावर आपले मत मांडले म्हणून त्याच्यावर हल्ला करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. अशा प्रकारचा हल्ला हा केवळ संबंधित व्यक्तीवर नसून लोकशाहीच्या मूल्यांवरही आघात असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्यांसोबत आपण असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांसह संबंधित यंत्रणांनी अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हल्ले थांबले पाहिजेत, अन्यथा कठोर धोरण घ्या’

डीजेच्या मुद्द्यावरून निर्माण होणारे वाद हिंसक स्वरूप घेऊ नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी नमूद केले. हल्ल्यांचे प्रकार थांबले नाहीत तर सक्तीचे धोरण स्वीकारण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

सोलापूरच्या धर्तीवर पुण्यात निर्णयाची गरज

डीजेच्या वापराबाबत सोलापूरमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातही परिस्थितीचा विचार करून आवश्यक निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.गणेशोत्सवाचा उत्साह आणि परंपरा कायम ठेवतानाच ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे डीजेच्या वापराबाबत प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती