सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
  • ‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं
 विश्लेषण

देव तारी त्याला कोण मारी! 9 दिवस ना अन्न, ना पाणी; मृत्यूच्या दाढेतून 2 कामगार सुखरूप बाहेर, नेपाळच्या महापुरातील थरारक घटना

डिजिटल पुणे    04-09-2026 13:41:03

नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठ्या प्रमाणात विध्वंस केला आहे. पुराच्या तडाख्यात अनेकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या संख्येने नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिक आणि कामगारांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. याचदरम्यान नेपाळमधून एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून प्रत्येकाला ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची आठवण होईल. महापुराच्या तब्बल नऊ दिवसांनंतर बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांची जिवंत सुटका करण्यात आली आहे.

रसुवा जिल्ह्यातील त्रिशुली-3ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात हे कामगार अडकले होते. 26 ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी आणि ढिगारा साचला. या ढिगाऱ्यामुळे जलविद्युत प्रकल्पातील काही कामगार बोगद्यातच अडकून पडले. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

नऊ दिवसांनंतर दोघे जिवंत सापडले

बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा शोध घेत असताना बचाव पथकाला आतून आवाज ऐकू आले. त्यामुळे बोगद्यात अडकलेले काही कामगार अजूनही जिवंत असल्याची आशा निर्माण झाली. अखेर नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन कामगारांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

सुटका करण्यात आलेल्या कामगारांची नावे संजय साह आणि कबीर महर्जन अशी आहेत. संजय साह हे मेकॅनिकल फोरमन, तर कबीर महर्जन हे मेकॅनिकल सुपरवायझर म्हणून काम करत होते. बचाव पथकाने सर्वप्रथम संजय साह यांना बोगद्यातून बाहेर काढले. त्यानंतर कबीर महर्जन यांनाही सुरक्षितपणे बाहेर आणण्यात आले.

बोगद्यात आणखी कामगार अडकले आहेत?

दोन कामगार सुखरूप सापडल्यानंतर बचाव पथकाचा उत्साह वाढला आहे. मात्र, बोगद्यात अजूनही काही कामगार अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आलेली नाही. बोगद्याच्या इतर भागांमध्येही बचाव पथकाकडून तपासणी केली जात आहे.

नॅशनल इंडिपेंडंट पार्टीचे खासदार आणि अभियंता श्री राम न्युपाने हे पूर आल्यापासून शोध आणि बचाव मोहिमेत सहभागी आहेत. त्यांच्या माहितीनुसार, बोगद्याच्या आत आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचाव पथकाकडून प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली जात आहे.

बोगद्यातून आला आवाज; बचाव पथकाने साधला संवाद

बचावकार्य सुरू असताना बोगद्याच्या आतून आवाज ऐकू आल्यानंतर परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला. बचाव पथकाने बोगद्याच्या आत आवाज देत “घाबरू नका, आम्ही तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आलो आहोत,” असा संदेश दिला.त्यावर आतून “ठीक आहे” असा प्रतिसाद ऐकू आल्याचे सांगण्यात आले. या प्रतिसादामुळे बोगद्यात एकापेक्षा अधिक व्यक्ती जिवंत असल्याची शक्यता बळावली. त्यानंतर नेपाळी लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाने बचावकार्य आणखी वेगाने सुरू केले.

बेपत्ता कामगारांचा शोध सुरूच

26 ऑगस्ट रोजी आलेल्या महापुराने रसुवा जिल्ह्यासह नेपाळच्या अनेक भागांमध्ये मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीनंतर अनेक नागरिक आणि कामगार बेपत्ता झाले असून, त्यांच्या शोधासाठी विविध यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, नऊ दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत अडकून राहिल्यानंतर दोन कामगार जिवंत बाहेर आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोगद्यात अजून कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.


 Give Feedback



 जाहिराती