सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
  • ‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं
 जिल्हा

छत्रपती संभाजीनगर हादरलं! एशियन हॉस्पिटलच्या NICU मध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्णांची सुखरूप सुटका

डिजिटल पुणे    04-09-2026 16:16:12

छत्रपती संभाजीनगर : शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (NICU) ही आग लागली. विशेष म्हणजे, आग लागली त्यावेळी NICUमध्ये 9 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. मात्र, अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व 9 बालकांसह एकूण 58 रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं.

पहाटे पावणे तीनच्या सुमारास आगीचा भडका

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे पावणे तीनच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडली. एसीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. NICUसारख्या संवेदनशील विभागात आग लागल्याने हॉस्पिटलमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करत अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे आगीचा भडका हॉस्पिटलच्या इतर भागात पसरण्याचा मोठा धोका टळला.

9 चिमुकल्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवलं

आगीच्या वेळी NICUमध्ये 9 बालकं उपचार घेत होती. अग्निशमन दल, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत सर्व बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.यानंतर उपचारांची गरज लक्षात घेऊन 5 बालकांना घाटी रुग्णालयात, 3 बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

पहिल्या मजल्यावर 58 रुग्ण होते उपचाराधीन

ज्या पहिल्या मजल्यावर आग लागली, त्या ठिकाणी एकूण 58 रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये NICUतील बालकांसह जनरल विभागातील 36 आणि स्पेशल रूममधील 13 रुग्णांचा समावेश होता. सर्व रुग्णांना कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.बचावकार्य अधिक वेगाने पार पाडण्यासाठी तब्बल 30 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवाहरनगर पोलीस तसेच आरसीपीच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली.

वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला

आगीची माहिती तातडीने मिळाल्याने अग्निशमन दलाला वेळीच घटनास्थळी पोहोचता आलं. जवानांची तत्परता, पोलिसांचं सहकार्य आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

अमरावतीतील दुर्घटनेनंतर पुन्हा हॉस्पिटलमधील आगीने चिंता वाढवली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमधील हॉस्पिटलच्या NICUमध्येच आग लागल्याने रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.सुदैवाने एशियन हॉस्पिटलमधील आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणी विशेषतः NICU आणि इतर अतिदक्षता विभागांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना किती सक्षम आहेत, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती